उस्मानाबाद, 02 ऑगस्ट : ग्रामीण भागातील गावांना जोडणारे रस्ते व रस्त्यातील नदी नाल्यावर असणारे पूल हे महत्त्वाचे सेतू असतात. परंतु, पावसाळा (rainy season) सुरू होताच अशा पुलांमुळे नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. कमी उंचीच्या पुलावरून (bridge) पावसाळ्यात पुराचे पाणी वाहते. संजितपूरच्या पुलावरून नागरिक व विद्यार्थ्यांची वर्दळ असल्यामुळे त्या पुलाची उंची वाढविण्याची मागणी अनेकदा करण्यात आली. मात्र, त्याकडे लोकप्रतिनिधी व प्रशासनाने दुर्लक्ष केल्यामुळे गेल्या 15 वर्षांपासून समस्या 'जैसे थे' परिस्थितीत आहे.
कळंब तालुक्यातील संजितपूर गावाजवळ असलेल्या सापनाई आणि संजितपूर या दोन गावाला जोडणारा एक पूल आहे. संजितपूर या गावात जाण्यासाठी गावकऱ्यांसाठी 15 वर्षांपूर्वी तेरणा नदीवर पूल उभारण्यात आला. मात्र, हाच पूल पाण्याखाली गेला असून रहदारीचा पर्याय पूर्णपणे बंद पडत आहे. पूल पाण्याखाली गेल्याने संजितपूर येथील जवळपास 421 नागरिकांची कोंडी झाली आहे. गावातून बाहेर पडण्यासाठी पर्यायी रस्ता देखील उपलब्ध नाही. हा एकच मार्ग कमी अंतराचा व सोयीचा असल्याने या गावातील नागरिक, शालेय तसेच महाविद्यालयीन विद्यार्थी, शेतकरी याच मार्गाने ये-जा करतात.
हेही वाचा- लहानपणी वाचा गेली पण जिद्द नाही; ग्रामीण भागातील मुक्या कलावंताची 'बोलकी' चित्रं
पावसाळ्यात तेरणा नदीला मोठ्या प्रमाणात पूर येतो. तेरखेडा येथून उगम पावणाऱ्या तेरणा नदीचा प्रवाह तेर या गावी मंदावतो. पावसाळ्यात संजितपूरच्या या पुलावरून पाणी वाहत असल्यामुळे नागरिकांना पूर ओसरण्याची वाट पहात अडकून पडावे लागते. दरवर्षी पावसाळ्यात या पुलामुळे नागरिकांना असाच त्रास सहन करावा लागतो. दरवर्षी या पुलांची उंची वाढविण्याची मागणी केली जाते. परंतु, कोणते ना कोणते कारण सांगून टाळाटाळ केली जाते. पुलांची उंची कमी झाल्यामुळे थोडा जरी पाऊस आला. तरी या गावाचा नेहमी संपर्क तुटतो. अनेक वर्षांपासून या समस्येवर तोडगा न निघाल्यामुळे नागरिकांमध्ये लोकप्रतिनिधींविरुद्ध नाराजी वाढत आहे. शासन जीवितहानी झाल्यानंतरच पुलाची उंची वाढविणार का? अशी चर्चा आता नागरिक करू लागले आहे.
गावकऱ्यांच्या जिवाला धोका
मागील वर्षी पावसाळ्यात पूल पाण्याखाली गेल्यानंतर गावातून बाहेर पडण्यासाठी रस्ता नसल्या कारणाने गावात वयोवृद्ध व्यक्ती, गरोदर महिला, लहान मुले असताना त्यांच्या जीविताला धोका निर्माण झाला होता. या वर्षीही एखादी निष्पाप व्यक्ती उपचाराअभावी आपला प्राण गमावते की काय अशी भीती निर्माण झाली आहे. या गावात २५ विद्यार्थी असून शाळकरी मुलांचे शिक्षणाचे नुकसान होत आहे. अशी अवस्था झाल्याची माहिती गावातील ग्रामस्थ अशोक बाराते यांनी दिली आहे.
हेही वाचा- खंडोबाचा थाट! Audi Q2 गाडीच्या किंमतीचे बनवले सिंहासन, Special Report
प्रत्येक वर्षी हीच अडचण
साधारणपणे प्रत्येक वर्षी हीच अडचण आमच्या समोर येते. थोडासा जरी पाऊस आला तर हा पूल पाण्याखाली जातो. आम्ही शेतात गेलेलो असतो आणि दुपारच्या दरम्यान जोराचा पाऊस झाला की आम्हाला नदीचे पाणी कमी होईपर्यंत वाट पहावी लागते. वाट पाहता पाहता बऱ्याचदा अंधार होतो. त्यामुळे घरी जाण्यासाठी उशीर होतो. सोबत शेळ्या असतात. त्यांचा सुरक्षिततेचा प्रश्न आमच्या समोर उपस्थित होत असल्याचे शेतकरी वैशाली देशमुख यांनी सांगितले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Maharashtra News, Osmanabad