मुंबई, 2 एप्रिल : राज्यात पुन्हा एकदा संपूर्ण लॉकडाऊन (Lockdown in Maharashtra) जाहीर होणार का याविषयी तर्कवितर्क सुरू असतानाच सत्ताधारी महाविकास आघाडीमधील काँग्रेस (Congress) आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) प्रमुख मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांकडे एक मागणी केली असल्याची सूत्रांनी माहिती दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसमधील प्रमुख काही मंत्र्यांनी राज्यातील आर्थिक स्थिती लक्षात घेता संपूर्ण लॉकडाऊन जाहीर करू नये, अशी भूमिका मांडल्याचे समजते. अर्थात याबाबत आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) नेमकी काय भूमिका घेणार याकडे लक्ष आहे. ‘राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात कोरोना रुग्ण आढळत आहेत. ज्या भागात कोरोनाचा अतिप्रादुर्भाव आहे अशा भागांमध्ये फक्त अधिक कडक नियमावली केली जावी, संपूर्ण राज्यामध्ये लॉकडाऊन जाहीर केला तर मोठ्या प्रमाणात नाराजी लोकांमध्ये वाढेल. तूर्तास जितके शक्य आहे तोपर्यंत तरी संपूर्ण राज्यात लॉकडाऊन जाहीर करू नये,’ अशी मागणी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील वरिष्ठ मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. मुख्यमंत्र्यांची केंद्र सरकारसोबत बैठक देशभरात कोरोना व्हायरसचे रुग्ण वाढल्याने निर्माण झालेल्या गंभीर स्थितीच्या पार्श्वभूमीवर आज केंद्र सरकारने सर्व राज्यांची एक बैठक बोलावली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हेदेखील या बैठकीत सहभागी होणार आहेत. त्यानंतर कदाचित संध्याकाळी फेसबुकद्वारे देखील ते जनतेशी संवाद साधण्याची शक्यता आहे. यामध्ये संपूर्ण राज्यात लॉकडाऊन जाहीर करण्याच्या ऐवजी काही प्रमाणात निर्बंध कठोर करण्याची शक्यता आहे. हेही वाचा - Pune Lockdown Breaking News: पुण्यात PMP सह हॉटेल, मॉल 2 आठवड्यांसाठी बंद; शहरात नवी नियमावली जाहीर विशेष म्हणजे कोरोना चाचण्याचं प्रमाण वाढवणे, तसंच कोरोना रुग्णांच्या संपर्कात येणाऱ्या लोकांचा शोध घेणे, लसीकरण वाढवणे असे काही प्रमुख अजेंडे हाती घेऊन त्यावर राज्य सरकार अधिक काम करण्याचा निर्णय घेईल, अशी माहिती आहे. या सर्व पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री आज नेमकी काय भूमिका जाहीर करतात, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.