मुंबई, 15 सप्टेंबर : महाविकास आघाडी सरकार पाडल्यानंतर शिंदे सरकारने आधीचे निर्णय रद्द करण्याचा धडाका लावला आहे. आता पुन्हा एकदा शिंदे सरकारकडून सर्व अशासकीय नियुक्त रद्द करण्यात आल्या आहेत. आता नव्याने शिंदे सरकारकडून अशासकीय नियुक्त जाहीर केल्या जाणार आहे.
राज्यात नवे सरकार आल्यावर आता आधीच्या महाविकास आघाडी सरकारने केलेल्या विविध महामंडळ, प्राधिकरण, समित्या, सरकारी उपक्रम आणि मंडळं यावरील अशासकीय सदस्यांच्या नियुक्त्या रद्द करण्याचे आदेश राज्याचे मुख्य सचिव मनूकुमार श्रीवास्तव यांनी सर्व विभागांना दिले आहेत.
या आदेशानुसार १६ सप्टेंबरपर्यंत सर्व विभागांनी त्यांच्या अंतर्गत येणाऱ्या सर्व अशासकीय नियुक्त्या रद्द करण्याचे प्रस्ताव सादर करण्यात येणार आहेत. त्यामुळे येत्या आठवड्याभरात महाविकास आघाडी सरकारने केलेल्या सर्व अशासकीय नियुक्त्या रद्द होणार असून महिनाभारत शिंदे-फडणवीस सरकार नव्या अशासकीय नियुक्त्या जाहीर करणार असल्याची माहिती मिळत आहे.
(मग 2 वर्षे फक्त खोक्यांची ओझी वाहत होता? शिवसेनेचा मुख्यमंत्र्यांवर जोरदार हल्लाबोल)
राज्यात सत्तांतर झाल्यानंतर नव्या सरकारच्या मर्जीतील असंतुष्ट व्यक्तींचे राजकीय पुर्नवसनही या नियुक्त्यांच्या मार्फत करणार असल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे शिंदे गट आणि भाजपमधील नाराजांना संधी मिळणार असल्याची चर्चा आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.