औरंगाबाद, 11मे: मुंबई, पुणेपाठोपाठ औरंगाबाद शहरासह जिल्ह्यात कोरोनाचं थैमान सुरुच आहे. कोरोनानं शहरात आणखी एकाचा मृत्यू झाला आहे. मृतांचा एकूण आकडा 14 वर पोहोचला आहे. तर सोमवारी 44 नवे रुग्ण आढळले आहेत. शहर आणि जिल्ह्यातील कोविडबाधितांची रुग्णांची संख्या 602 वर पोहोचली आहे.
मुकुंदवाडी येथील राम नगरातील 80 वर्षीय कोविडबाधित पुरूष रुग्णाचा मध्यरात्री 1.10 मिनिटांनी उपचारादरम्यान मृत्यू झाला. अशी माहिती घाटी हॉस्पिटलचे माध्यम समन्वयक डॉ. अरविंद गायकवाड यांनी दिली आहे.
हेही वाचा.. राजधानी हादरली! ड्युटीवर असलेल्या नर्ससोबत अॅम्ब्युलन्स ड्रायव्हरनं केलं असं...
ताप, खोकला आणि दम लागत असल्याने या व्यक्तीला 8 मे रोजी दुपारी घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. 9 मे रोजी कोविड चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्यांच्यावर 8 मेपासूनच कोविडसाठी अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. जास्त दम लागत असल्याने व शरिरातील ऑक्सिजनचे प्रमाण कमी होत असल्याने त्यांना 10 मेपासून व्हेंटिलेटरवर ठेवलं होतं. परंतु त्यांचे वय जास्त आणि न्युमोनिआ, श्वसनाचेही विकार असल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचं डॉ. अरविंद गायकवाड यांनी सांगितलं.
44 कोरोनाबाधित नव्या रुग्णांची वाढ
रुग्णांचा औरंगाबाद शहरातील न्याय नगर (02), संजय नगर (01), एसआरपीएफ, सातारा परिसर (01), कोतवाल पुरा (01), एन-4 सिडको (01), सदानंद नगर, सातारा परिसर (08), बीड बायपास रोड (01), भवानी नगर, जुना मोंढा (03), पुंडलिक नगर, गल्ली क्रमांक 06 (01), दत्त नगर-कैलास नगर, लेन क्रमांक 05 (05), कैलास नगर (01), बायजीपुरा (01), राम नगर (06), किल्ले अर्क (08) आणि ग्रामीण भागातील सातारा गाव (01), गंगापूर तालुक्यातील फुलशिवरा (03) हा परिसर आहे. या रुग्णांमध्ये 27 पुरूष आणि 17 महिलांचा समावेश असल्याचे मिनी घाटी प्रशासनाच्या वतीने कळवण्यात आलं आहे.
हेही वाचा.. खड्ड्यात फेकलं नवजात अर्भक! कारण ऐकाल तर सुन्न होईल तुमचं डोकं
जालना 'रेड झोन'च्या उंबरठ्यावर...
जालन्यात सोमवारी दोन नवीन कोरोना पोजिटिव्ह रुगणांची भर पडली. कोरोना रुगणांचा आकडा 13 वर पोहोचल्याने जालना जिल्हा आता रेड झोनच्या उंबरठ्यावर येऊन ठेपला आहे.
पॉझिटिव्ह आढळून आलेल्या रुग्णांमध्ये जिल्हा सरकारी रुग्णालयातील परिचारिका आणि महिला पोलिस कॉन्स्टेबलचा समावेश आहे.
मालेगाव येथून बंदोबस्त करून परतलेल्या व सध्या जालना येथील पोलीस प्रशिक्षण केंद्रात क्वारंटाईन करून ठेवण्यात आलं आहे. एका जवानाच्या लाळेचे नमुने प्रयोग शाळे पाठवण्यात आलं होतं. सदर अहवाल नुकताच जिल्हा रुग्णालयास प्राप्त झाले असून दोन्ही अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाले आहे. यामुळे जालना जिल्ह्यातील पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आता 13 झाली असून जालना जिल्हा आता रेड झोनच्या उंबरठ्यावर येऊन पोहोचला आहे. ज्यामुळे जालनेकरांची चिंता आता अधिक वाढली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Aurangabad, Corona, Coronavirus