मुंबई, 12 एप्रिल : कोरोनाच्या संकटाने भारताला धडक दिल्यानंतर देशभरात लॉकडाऊन करण्यात आले. लॉकडाऊनमुळे बंद झालेल्या उद्योगधंद्यामुळे केंद्र आणि राज्य सरकारची आर्थिक स्थिती बिकट झाली आहे. अशातच या संकटातून उभारी घेण्यासाठी सरकारकडून लोकांना फंड जमा करण्याचं आवाहन करण्यात येत आहे. मात्र यातही आता केंद्र विरुद्ध राज्य असा संघर्ष निर्माण होत आहे. पीएम केअरला दिलेली मदतच CSR अंतर्गत धरण्याचा निर्णय घेण्यात आल्यानंतर राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी केंद्र सरकारला लक्ष्य केलं आहे. ‘CM केअरऐवजी केवळ PM केअरसाठी दिलेली मदतच CSR अंतर्गत धरण्याचा निर्णय धक्कादायक आहे. हे चुकून झालं असल्यास दुरूस्ती करावी. पण जाणीवपूर्वक केलं असेल तर केंद्र व राज्य असा भेदभाव योग्य नाही. अडचणीच्या काळात केंद्राप्रमाणेच राज्यालाही मदतीची गरज असते, हे लक्षात घ्यावं,’ असं ट्वीट रोहित पवार यांनी केलं आहे.
CM केअरऐवजी केवळ PM केअरसाठी दिलेली मदतच CSR अंतर्गत धरण्याचा निर्णय धक्कादायक आहे. हे चुकून झालं असल्यास दुरूस्ती करावी. पण जाणीवपूर्वक केलं असेल तर केंद्र व राज्य असा भेदभाव योग्य नाही. अडचणीच्या काळात केंद्राप्रमाणेच राज्यालाही मदतीची गरज असते, हे लक्षात घ्यावं.@narendramodi
— Rohit Pawar (@RRPSpeaks) April 12, 2020
दरम्यान, रोहित पवार यांनी नुकताच राज्यातील भाजप नेत्यांवरही अप्रत्यक्षपणे निशाणा साधला होता. ‘राष्ट्रीय संकटात विरोधी पक्षाने सरकारला सहकार्य करण्याची महाराष्ट्राची परंपरा आहे. आताचे विरोधक थोडे विचलित झाल्यासारखे वाटतात पण तेही ही परंपरा पाळतील अशी मी आशा व्यक्त करतो,’ असं रोहित पवार यांनी म्हटलं होतं.