मुंबई, 21 ऑगस्ट : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि अजित पवार यांचे कट्टर समर्थक सुनील तटकरे शिवसेनेच्या वाटेवर असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली आहे. शिवसेना प्रवेशाबाबत सुनील तटकरे यांची पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत चर्चा झाल्याची माहिती आहे. सुनील तटकरे हे राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अत्यंत जवळचे सहकारी म्हणून ओळखले जातात. त्यामुळे तटकरेंचा शिवसेनेत प्रवेश झाल्यास अजित पवारांसाठी मोठा धक्का असू शकतो. दुसरीकडे, सुनील तटकरे यांनी प्रवेश केल्यास कोकणात शिवसेनेला मोठा फायदा होणार, हे उघड आहे. कारण रायगड जिल्ह्यात तटकरेंचा चांगला प्रभाव आहे. यातूनच तटकरेंच्या प्रवेशाने शिवसेना कोकणात अधिक मजबूत होईल. हाच हेतू समोर ठेवून शिवसेनेच्या नेतृत्वाने सुनील तटकरे यांच्याशी संपर्क केल्याची माहिती आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीचे आणखी कोणते नेते युतीच्या वाटेवर? काँग्रेस राष्ट्रवादीतील आणखी काही दिग्गज नेते भाजपच्या वाटेवर आहेत. यामध्ये राष्ट्रवादीचे साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले, काँग्रेसचे दिग्गज नेते हर्षवर्धन पाटील यांच्यासह अनेकांच्या नावांची चर्चा आहे. वाचा- उदयनराजे भोसले यांचा भाजप प्रवेश निश्चित, राष्ट्रवादीला लवकरच देणार सोडचिठ्ठी काँग्रेस आणि राष्ट्रवादीतील पश्चिम महाराष्ट्रातील अनेक नेते पक्षात घेण्याच्या जोरदार हालचाली भाजपने सुरू केल्या आहेत. पश्चिम महाराष्ट्रातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हर्षवर्धन पाटील आणि राज्यातील भाजपच्या प्रमुख नेत्यांमध्ये पक्षप्रवेशावर चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे नातेवाईक असणारे पद्मसिंह पाटील घराणे देखील भाजपाच्या संपर्कात असल्याची चर्चा आहे. पद्मसिंह पाटलांसह त्यांचा मुलगा आमदार राणाजगजितसिंह भाजपात जाण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे फलटणचे नेते रामराजे निंबाळकर भाजपमध्ये जाण्याची शक्यता आहे. रामराजे आणि भाजप नेत्यांमध्ये याबाबत चर्चा झाल्याचीही माहिती आहे. करमाळ्या राष्ट्रवादीच्या नेत्या रश्मी बागल, माढ्याचे आमदार बबनदादा शिंदे यांचा मुलगा रणजितसिंह शिंदे, तसच बार्शीचे राष्ट्रवादीचे आमदार दिलीप सोपल, काँग्रेसचे अक्कलकोटचे आमदार सिद्धराम म्हेत्रे हे ही भाजप आणि शिवसेनेत दाखल होण्याची शक्यता आहे. राज ठाकरेंच्या मदतीला दादूस आला धावून, पाहा काय म्हणाले उद्धव ठाकरे…
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

)







