मंदिरं आणि धार्मिक स्थळं खुली व्हावीत, तरुणाच्या मागणीला रोहित पवारांनीही दिली साथ

मंदिरं आणि धार्मिक स्थळं खुली व्हावीत, तरुणाच्या मागणीला रोहित पवारांनीही दिली साथ

तरुणाने ट्विटरवरून रोहित पवारांकडे एक मागणी केली आणि आमदार पवार यांनीही त्याला तिथेच उत्तर दिलं आहे.

  • Share this:

मुंबई, 16 ऑगस्ट : लोकांच्या इच्छा, अपेक्षा जाणून घेण्यासाठी आता राजकीय नेत्यांना प्रत्यक्ष भेटण्याची आवश्यकता नसते. अनेक नेते सोशल मीडियाच्या माध्यमातून विविध प्रश्नांबाबत लोकांचं समाधान करत असतात. राष्ट्रवादीचे नेते आणि आमदार रोहित पवार हेदेखील याला अपवाद नाहीत. लॉकडाऊनमुळे दुर्दशा झालेल्या एका व्यापारी तरुणाने ट्विटरवरून रोहित पवारांकडे एक मागणी केली आणि आमदार पवार यांनीही त्याला तिथेच उत्तर दिलं आहे.

'मंदिर चालू करा दादा, तुळजाभवानी मंदिर 5 महिने झाले बंद आहे. इथल्या व्यापाऱ्यांना खूप त्रास होत आहे. बँक EMI वाढत चालले आहेत,' अशा शब्दांमध्ये अजिंक्य नावाच्या तरुणाने आपलं दु:ख व्यक्त केलं.

अजिंक्यच्या मागणीवर उत्तर देत रोहित पवार म्हणाले की, 'मंदिरं आणि धार्मिक स्थळं लोकांसाठी खुली करायला पाहिजेत, असं माझंही म्हणणं आहे. कारण त्या भागात असलेल्या अनेक व्यावसायिकांची रोजीरोटी त्यावर अवलंबून आहे. लोकांच्या धार्मिक भावनाही असतात. त्यामुळं याबाबत मी जरूर पाठपुरावा करील.'

भाजपनेही केली होती मागणी

कोरोनामुळे लॉकडाऊन लागू झाल्यानंतर गेले काही महिने राज्यातील मंदिरे बंद आहेत. त्यामुळे तेथे पूजाअर्चा करणाऱ्या गुरव समाजाचे उत्पन्न बंद झाले असून उपासमारीची वेळ आली आहे. त्याचवेळी, मंदिराच्या पूजेचा व देखभालीचा खर्च कायमच आहे. त्यामुळे राज्य सरकारने मंदिरांच्या देखरेखीसाठी पॅकेज जाहीर करावे आणि गुरव समाजाला थेट आर्थिक मदत करावी, अशी मागणी भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली होती.

Published by: Akshay Shitole
First published: August 16, 2020, 4:20 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading