निलेश पवार, प्रतिनिधी नंदुरबार, 16 जून : गेल्या वर्षी आयकर विभागाच्या छापे सत्रामुळे चर्चेत आलेला आणि वारंवार अजित पवार यांच्याशी नाव जोडल्या गेलेला नंदुरबार जिल्ह्यातील आयान मल्टीट्रेड साखर कारखाना पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. नंदुरबार दौऱ्यावर असलेल्या अजित पवार यांनी या कारखान्याला छुपी भेट दिल्याने आता नव्या वादांना तोंड फुटले आहे. काय आहे प्रकरण? नंदुरबार जिल्हा दौऱ्यावर असलेले अजित पवार सकाळी खान्देश एक्सप्रेसने नंदुरबारमध्ये दाखल झाले. यानंतर शासकीय विश्रामगृहावर काही काळ आरामानंतर ते आपल्या गाडीतून खाजगी कामानिमित्ताने बाहेर पडले. यावेळी पोलीस ताफा अथवा कुठलाही लावाजमा त्यांच्या समवेत नसल्याने अजित पवार गेले तरी कुठे हा प्रश्न सर्वांनाच पडला होता. अशातच ते तालुक्यातील समशेरपूरस्थित आयान मल्टीट्रेड साखर कारखान्यात असल्याची माहीती माध्यम प्रतिनिधींना मिळाली. यानंतर माध्यम प्रतिनिधी देखील चित्रीकरणासाठी याठिकाणी दाखल झालेत. मात्र, बारा सव्वा बाराच्या सुमारास अजित पवार साखर कारखान्यातून आपल्या खाजगी गाडीतून बाहेर पडले. यावेळी बाहेर असलेल्या माध्यम प्रतिनिधींनी देखील त्यांचे चित्रीकरण केले. पवार कोणाशीही न बोलता गाडीतून निघून गेले. मात्र, यानंतर आता आरोप प्रत्यारोपाच्या फैरींना सुरुवात झाली आहे. अजित पवारांनी या कारखाना भेटीबाबत आज दुसऱ्या दिवशी अंमळणेर येथे स्पष्टीकरण देत शेतकऱ्यांनी आमंत्रीत केल्याने साखर कारखान्याला भेट दिल्याचे सांगितले आहे. वाचा - अजित पवारांना शिवसेनेच्या मोठ्या नेत्याकडून थेट ऑफर, केलं मोठं विधान भाजपला आयतं कोलित? साखर कारखान्याच्या या छुप्या भेटीदरम्यान अजित पवारांनी याठिकाणचा पोलीस बंदोबस्त आणि ताफा देखील कारखाना बाहेरच उभा केला आहे. हा कारखाना त्यांच्या मालकीचा असल्याचा सातत्यान आरोप देखील झाला होता. बारामतीमध्ये त्यांच्या निकटवर्तीयांवर पडलेल्या आयकर विभागाच्या धाडीवेळी देखील ह्या कारखान्यात छापे पडले होते. आयान मल्टीट्रेड हा कारखाना सचिन शिणगारे हेच चालवत आहे. मात्र, अजित पवार यांच्या या साखर कारखान्याच्या छुप्या भेटीनंतर भाजपाला आयत कोलीत मिळाले असून यावरुन भाजपाने त्यांना घेरण्याचा प्रयत्न सुरू केले आहे. जर कारखान्यात शेतकऱ्यांनाच भेटायचं होतं. मग सुरक्षा बाजुला सारून धोका का पत्कारला असा प्रश्न आता भाजप उपस्थित करत आहे. या कारखान्याला अजित पवारांनी दिलेली भेट आणि त्यात व्यतीत केलेल्या दीड दोन तासात कारखान्यात नेमक काय केले? याबाबत देखील तर्क वितर्क लढवल्या जात आहे. आघाडीच्या काळात पुष्पदंतेश्वर कारखाना हा भंगाराच्या भावात विकला गेला. तेव्हापासूनच हा कारखाना वादाचे केंद्र असताना अजित पवारांची छुप्या भेटीने नव्या चर्चेला तोंड फोडलं हे निश्चित.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.