Home /News /maharashtra /

'काळ आला होता, पण वेळ नाही', धनंजय मुंडेंना अश्रू अनावर

'काळ आला होता, पण वेळ नाही', धनंजय मुंडेंना अश्रू अनावर

काळ आला होता पण संत भगवान बाबांमुळे वेळ आली नाही, अशी भावना राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी व्यक्त केली.

अहमदनगर, 21 एप्रिल : काळ आला होता पण संत भगवान बाबांमुळे वेळ आली नाही, अशी भावना राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी व्यक्त केली. अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यातील शिंदोरी या गावात संत भगवान बाबा यांच्या 88 व्या नारळी सप्ताह निमित्त काल्याचे कीर्तन आयोजित करण्यात आले होते. सप्ताहाच्या काल्याच्या कीर्तनासाठी धनंजय मुंडे आले होते. भगवान गडाचे महंत नामदेव महाराज शास्त्री यांचे कीर्तन झाल्यानंतर धनंजय मुंडे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. काळ आला होता. पण भगवान बाबा यांच्यामुळे वेळ आली नव्हती, असं म्हणताच धनंजय मुंडे यांना अश्रू अनावर झाले. यावेळी नामदेव शास्त्री महाराज यांनीदेखील आपलं मत मांडलं. "मला धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे दोघेही सारखेच. पण जो जवळ येणार त्याच्यावर मी प्रेम करणार. भगवान बाबाचे दरवाजे दोघांसाठीही उघडे आहेत. मात्र गडावर राजकीय भाषण नाहीच. माझ्या सर्व चौकशा झाल्या. मला बदनाम करण्याचा मोठे षडयंत्र रचले गेले. पण मी घाबरत नाही. मंदिराचं काम सध्या सुरू आहे. त्या मंदिराला लागणारा दगड हे गोपीनाथ मुंडे देणार होते. मात्र दुर्दैवाने ते होऊ शकलं नाही. ते काम आज धनंजय मुंडे करणार आहेत", असं नामदेव शास्त्री महाराज म्हणाले. ('आधी जिजाऊंची माफी मागा मगच..., वादग्रस्त विधानावर अमोल मिटकरींचं अखेर स्पष्टीकरण) धनंजय मुंडे यांना गेल्या आठवड्यात हृदय विकाराचा सौम्य धक्का आल्याची बातमी समोर आली होती. पण उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ती माहिती चुकीची असल्याचं स्पष्ट केलं होतं. सतत प्रवास, दगदग यातून त्यांना भोवळ येऊन शुद्ध हरपली आणि त्यानंतर तातडीने त्यांना ब्रीच कँडी मध्ये दाखल करण्यात आले. त्यांना हृदयविकाराचा धक्का बसला, हे वृत्त चुकीचे आहे; डॉक्टरांनी आणखी काही चाचण्या सांगितल्या असून सक्तीची विश्रांती घेण्याचा सल्ला दिला असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली होती. दरम्यान, राज्याचे मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनीही धनंजय मुंडे यांना दूरध्वनीवरून संपर्क करत विचारपूस करून काळजी घेण्याचा सल्ला दिला होता. त्याचबरोबर खासदार सुप्रियाताई सुळे, युवक नेते पार्थ पवार, राज्यमंत्री दत्ता मामा भरणे यांनी रुग्णालयात जाऊन धनंजय मुंडे यांची भेट घेऊन चौकशी केली होती. तसेच धनंजय मुंडे यांना रुग्णालयात दाखल केल्यानंतर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनीही विचारपूस करत माध्यमांना मुंडेंच्या प्रकृतीबद्दल माहिती दिली होती.
Published by:Chetan Patil
First published:

पुढील बातम्या