अकोला, 21 एप्रिल : राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी (ncp mla amol mitkari) यांनी ब्राम्हण समाजाबद्दल केलेल्या विधानामुळे वाद पेटला आहे. पण, ‘मी कोणत्याही पक्षाबद्दल आणि जातीबद्दल बोललो नाही. ज्यांना वाटत असेल मी माफी मागावी त्यांनी अगोदर जिजाऊंची माफी मागावी मी माफी मागायला तयार आहे’ असं म्हणत अमोल मिटकरी यांनी माफी मागण्यास स्पष्ट नकार दिला. राष्ट्रवादीच्या संवाद यात्रेला इस्लामपूरमध्ये सुरुवात झाली. यावेळी बोलत असताना अमोल मिटकरी यांनी ब्राम्हण समाजाबद्दल वादग्रस्त विधान केले होते. त्यांच्या विधानामुळे राज्यभरात भाजप आणि हिंदुत्त्वाची संघटनांनी अमोल मिटकरींच्या विधानाचा निषेध केला. अखेरीस मिटकरी यांनी स्पष्टीकरण दिलं. ‘मी कोणत्याही पक्षाबद्दल आणि जातीबद्दल बोललो नाही. मी कोणत्याही धर्माच्याविरोधात बोलणार व्यक्ती नाही. कारण मी भारतीय राज्यघटनेचा मान राखणार आहे. फक्त भारतीय जनता पार्टी प्रणित काही संघटना विरोधात उतरल्या आहेत. राष्ट्रवादीला टार्गेट करण्यासाठी राजकारण चालू आहे’ असा आरोपच मिटकरींनी केला. ( मुंबईकरांनो काळजी घ्या, पण निर्धास्त राहा! सुरक्षेसाठी मुंबई पोलिसांनी कसली कंबर ) ‘यशंवत चव्हाण आणि शरद पवार यांच्या विचारांवर विश्वास ठेवणारा आणि जपणारा मी सामन्य कार्यकर्ता आहे. त्यामुळे माफी मागण्याचा प्रश्नच नाही. ज्यांना वाटत असेल मी माफी मागावी त्यांनी अगोदर जिजाऊंची माफी मागावी मी माफी मागायला तयार आहे’ असं मिटकरी म्हणाले. अकोल्यात अमोल मिटकरींविरोधात तक्रार दरम्यान, राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांचे विरोधात आकोट पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. ब्राम्हण समाजाची बेअब्रू केल्याचा आरोप करण्यात आला आहे. पश्चिम महाराष्ट्रातील ईस्लामपूर जि. सांगली येथील जाहीर सभेत ब्राम्हण समाजाची बेअब्रू केल्याप्रकरणी आमदार अमोल मिटकरी यांचेवर गुन्हे दाखल करण्याबाबत आकोट शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. सायबर क्राईम अंतर्गत ही तक्रार तपासात ठेवण्यात आली आहे. जयंत पाटलांनी व्यक्त केली दिलगिरी अमोल मिटकरी यांनी जे सभेत भाषण केले ते त्यांचे वैयक्तिक मत होतं. मिटकरी यांनी मंत्राचा उल्लेख केल्यानंतर भाषण थांबवण्याची विनंती केली. ब्राह्मण समाजाने नेहमी आम्हाला सहकार्य केले आहे. मिटकरी यांनी असं बोलायला नको होतं, मला याचा खेद वाटतो. सांगलीमध्ये ही सभा होती त्यामुळे कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी दिलगिरी व्यक्त करतो, असं म्हणत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिलगिरी व्यक्त केली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.