औरंगाबाद, 11 जुलै : शिवसेना आणि शिंदे गटाचा वादावर सर्वोच्च न्यायालयाने (supreme court) सुनावणीसाठी नकार दिला असून निर्णय जैसे थेच ठेवण्याचे आदेश दिले आहे. तर,’ न्यायालयाने काय निकाल दिला आहे, अद्याप तो वाचला नाही, त्यामुळे यावर आताच बोलता येणार नाही’, असं म्हणत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (sharad pawar) यांनी मोजक्या शब्दांत प्रतिक्रिया दिली. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे औरंगाबाद जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहे. शहरातील वसंतराव नाईक महाविद्यालयात कार्यक्रम पार पडला. यावेळी पत्रकारांशी बोलत असताना त्यांनी राज्यातील राजकीय घडामोडींवर भाष्य केलं. ’ शिंदे गटातील 16 आमदारांवर कारवाई करण्यासाठी शिवसेनेनं सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. आज सुनावणी झाली आहे पण मी न्यायालयाचा निकाल वाचला नाही. त्यामुळे न्यायालयीन प्रक्रियेवर बोलणं योग्य राहणार नाही ’ असं म्हणत शरद पवार यांनी न्यायालयाच्या निकालावर बोलणे टाळले आहे. ( कोर्टाने शिंदे गटाला दिलासा दिल्यानंतर शिवसेनेची पहिली प्रतिक्रिया… ) तर, ‘वसंतराव नाईक यांच्यासोबत काम केलं. माझ्या अंतकरणात दोन लोकांच्या आठवणी कोरल्या गेल्या आहेत, पण यशवंतराव चव्हाण आणि वसंतराव नाईक यांची आठवण आहे, असंही शरद पवार म्हणाले. ‘मला तिकीट देताना आमच्या जिल्ह्यातील नेते विरोध करत होते. 25- 26 वय असेल इतक्या लहान मुलाला तिकीट देऊ नका म्हणून वसंतराव नाईक यांच्याकडे गेले. तेव्हा वसंतराव नाईक म्हणाले, 288 जागा त्यातील किती निवडून येतील? तर 180 किंवा 190 येतील. मग वसंतराव म्हणाले की, मग 80 ते 90 जागा पडतील तर त्यातील आणखी एक जागा पडेल म्हणून मला तिकीट दिलं आणि मी निवडून आलो आणि मला त्यावेळी राज्यमंत्रिपद दिलं, म्हणून वसंतराव यांचा मी उल्लेख करतो, असं म्हणत शरद पवारांनी वसंतरावांच्या आठवणींना उजाळा दिला. सुप्रीम कोर्टामध्ये काय घडलं? शिवसेनेमध्ये बंडखोरी करणाऱ्या 16 आमदारांविरोधात शिवसेनेनं याचिका दाखल केली होती. या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. सरन्यायाधीश एनव्ही रमाना यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठासमोर या प्रकरणी सुनावणी झाली. CJI यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठात न्यायमूर्ती हिमा कोहली आणि कृष्णमुरारी यांचाही समावेश होता. ( VIDEO: बंडखोर भरत गोगावले यांच्या कारला अपघात; एकामागोमाग सात गाड्यांची धडक ) शिवसेनेच्या वतीने कपिल सिब्बल यांनी सरन्यायाधीशांकडे महाराष्ट्राच्या या प्रकरणाची लवकर सुनावणी घेण्याची मागणी केली होती. शिवसेनेच्या गटाच्या आमदारांना उद्या विधानसभा अध्यक्षासमोर उत्तर द्यायचे आहे, अशा स्थितीत या प्रकरणाची आज सुनावणी व्हायला हवी अशी मागणी सिब्बल यांनी केली. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने आज सुनावणी घेण्यास नकार दिला. तसंच, याचिका दाखल केलेल्या शिंदे गटाच्या 16 आमदारांवर कारवाई करू नये, असे निर्देश कोर्टाने विधानसभा अध्यक्षांना दिले आहे. या प्रकरणी नव्याने खंडपीठ स्थापन केले जाईल, त्यानंतर सुनावणी घेतली जाईल, तोपर्यंत 16 आमदारांवर कारवाई करू नये, असे कोर्टाने स्पष्ट आदेश दिले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.