सोलापूर, 04 ऑक्टोंबर : मागच्या काही दिवसांपूर्वी पालकमंत्र्यांच्या घोषणा करण्यात आल्या. यामध्ये महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना सोलापूर आणि नगर जिल्ह्याचे पालकमंत्रीपद देण्यात आले. मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते आज सोलापूर जिल्ह्यात विविध पुतळ्यांचे उद्घाटन होणार होते परंतु मंत्र्यांच्या उद्घाटनापूर्वीच राष्ट्रवादीच्या काही कार्यकर्त्यांनी याचे उद्घाटन केले आहे. यामुळे हा वाद चांगलाच पेटण्याची शक्यता आहे.
महाविकास आघाडीच्या काळात माजी पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी या कामासाठी निधी आणि सुशोभिकरणासाठी निधी दिला होता. यांच्या कार्यकाळात सुशोभीकरणाच्या कामाला मंजुरी मिळाली आणि तात्कालीन पालकमंत्री भरणे यांनी एक कोटी रुपये निधी सुशोभीकरणासाठी मंजूर केला होता.
हे ही वाचा : संजय राऊतांना मोठा झटका; जेलमध्ये मुक्काम वाढला, न्यायालयीन कोठडीत पुन्हा वाढ
सत्तांतर झाल्यानंतर आज नूतन पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे पहिल्यांदाच सोलापुरात येणार होते. याचे औचित्य साधून त्यांच्या हस्ते चार हुतात्मा आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर परिसराचे सुशोभीकरण कामाचे उद्घाटन करण्यात येणार होते. परंतु त्या अगोदरच राष्ट्रवादी आणि धनगर समाज सेवा मंडळाच्यावतीने उद्घाटन करण्यात आले.
दरम्यान, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या दौऱ्यात हा सुशोभीकरण कामाचा शुभारंभ होणार होता. ज्या माजी दत्तात्रय भरणे यांनी निधी मंजूर केला त्या कामाचे उद्घाटन भाजपचे पालकमंत्री करत असून, याचे सर्व श्रेय नूतन पालकमंत्री घेत आहेत असा आरोप राष्ट्रवादीकडून करण्यात आला आहे. हा परिसर सुशोभीकरण व्हावा यासाठी सर्व पक्षाचे राजकीय नेते, धनगर समाज बांधव यांनी तात्कालीन पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडे सतत पाठपुरावा केला होता.
हे ही वाचा : 5G नंतर आता आणखी एका क्षेत्रात भारताची आत्मनिर्भर बनण्याची तयारी
त्यानुसार माजी पालकमंत्री भरणे यांनी सदर कामासाठी निधी मंजूर केला होता. परंतु या कामाचे उदघाटन करण्यासाठी प्रशासनाकडून कोणतेही प्रोटोकॉल पाळले गेले नाहीत. आज होणाऱ्या उद्घाटन कार्यक्रम पत्रिकेत चार हुतात्म्यांच्या वारसदारांचे देखील नाव नाही. आजच्या उदघाटन कार्यक्रमाला पुरातत्व खात्याची परवानगी घेतली आहे का, याबाबत भाजप हे प्रशासनावर दबाव आणून काम करून घेत असल्याचा आरोप राष्ट्रवादी युवक काँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष प्रशांत बाबर आणि धनगर समाज सेवा मंडळाचे अध्यक्ष शेखर बंगाळे यांनी केला.