मुंबई, 21 ऑक्टोबर : महाविकास आघाडीवर जोरदार प्रहार करणाऱ्या अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. बोगस जात प्रमाणपत्र दिल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी शिवडी कोर्टात यावर सुनावणी सुरू होती. या सुनावणीवर शिवडी कोर्टाने बोगस जात प्रमाणपत्र प्रकरणी नवनीत राणा यांच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट काढण्यात आला आहे. याचबरोबर मुंलूंड पोलिसांनाही कारवाई करण्याचे निर्देश कोर्टाने दिले आहेत. शिवडी कोर्टाने याबाबचे आदेश पोलिसांना दिले आहेत. त्यामुळे आता नवनीत राणा यांच्यावर काय कारवाई होणार का? यावर सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
खासदार नवनीत राणा यांच्या विरोधात बोगस जात प्रमाणपत्र दिल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. यावर मागच्या महिन्यांपासून सुनावणी सुरू होती. यावर शिवडी कोर्टाने निर्णय दिल्याने राणा यांच्यावर कारवाई होणार का? अशी चर्चा रंगली आहे. शिवडी कोर्टाने आदेश देताच खासदार राणा यांनी बोगस जात प्रमाणपत्राप्रकरणी मुंबई सत्र न्यायालयात दाद मागितली आहे.
हे ही वाचा : दिवाळीपूर्वी शिंदे-फडणवीस सरकारचा मोठा निर्णय, आयपीएस अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या
मात्र सत्र न्यायालयाने कारवाईला स्थगिती दिलेली नाही. त्यामुळे आता शिवडी कोर्टाने महत्त्वपूर्ण आदेश दिल्यामुळे नवनीत राणांच्या अडचणीत वाढ झालीय. शिवडी महानगर दंडाधिकारी कोर्टाने पोलिसांनी अजामीनपात्र वॉरंट काढत कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. शिवडी कोर्टाने दिलेल्या आदेशानुसार
7 नोव्हेंबर रोजी याप्रकरणाची पुढील कारवाई होणार आहे. तोपर्यंत नवनीत राणा यांना कोणताही दिलासा मिळालेला नाही. दरम्यान, मुलुंड पोलीस नवनीत राणांविरोधात अजामीनपात्र वॉरंटवर कारवाई करतात का? हे औत्सुक्याचे आहे.
तर नवनीत राणा यांची खासदारकी रद्द होणार?
शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव अडसूळ आणि सुनील भालेराव यांनी नवनीत राणा यांच्याविरोधात उच्च न्यायालयात याचीका दाखल केली होती. यावर उच्च न्यायालयाने मागच्या वर्षी जून महिन्यात राणा यांचे जातप्रमाणपत्र बोगस असल्याचे सांगत त्यांचे जात प्रमाणपत्र रद्द करण्यात आलं होतं. राणा यांना दोन लाखांचा दंडही उच्च न्यायालयाने सुनावला होता. मुंबई हायकोर्टाच्या निकालानंतर नवनीत राणा यांची खासदारकी धोक्यात आली होती. दरम्यान, नवनीत राणा यांनी मुंबई हायकोर्टाच्या निर्णयाला सुप्रीम कोर्टात आव्हान दिलं होतं. त्यानंतर जून 2021मध्ये सुप्रीम कोर्टाने हायकोर्टाच्या निर्णयावर स्थगिती दिली होती.
हे ही वाचा : 3 लाख कोटींचा प्रकल्प राज्याबाहेर जाणार? शिंदे-फडणवीसांनी घेतली तातडीची बैठक
नवनीत राणा यांच्या वडिलांवर गंभीर आरोप
नवनीत राणा यांच्या वडिलांविरोधात गंभीर आरोप करण्यात आला आहे. त्यांनी फसवणूक करुन जात प्रमाणपत्र मिळवले असल्याचा आरोप काहींनी केला आहे. यावरून पुन्हा राजकारण तापण्याची शक्यता आहे. जात प्रमाणपत्रासाठी शाळा सोडल्याचा बोगस दाखला दिल्याचा आरोप नवनीत राणांवर आहे. याप्रकरणी नवनीत राणांसह त्यांच्या वडिलांवरही मुलुंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.