Home /News /maharashtra /

VIDEO: नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाची रचना कमळाप्रमाणे; पाहा कसं असेल हे Airport

VIDEO: नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाची रचना कमळाप्रमाणे; पाहा कसं असेल हे Airport

पनवेल येथील हे ग्रीनफिल्ड विमानतळ चार टप्प्यात उभारले जाणार आहे. हे विमानतळ पूर्ण क्षमतेनं कार्यान्वित झाल्यानंतर वर्षाकाठी 90 दशलक्ष प्रवाशांची सोय होणार आहे.

    नवी मुंबई, 12 जून : पनवेल (Panvel) जवळील प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळाची (International Airport) उभारणी जीव्हीके कंपनी (GVK Group) करत आहे. या विमानतळाच्या डिझाईनचा एक व्हिडीओ नुकताच प्रसिध्द करण्यात आला आहे. या विमानतळाची रचना अतिशय वैशिष्ठपूर्ण अशी असणार हे या व्हिडीओतून स्पष्ट होत आहे. परदेशात विविध कारणांनी प्रवास करणाऱ्यांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळे नवे विमानतळ ही काळाची गरज आहे. या पार्श्वभूमीवर या आंतरराष्ट्रीय विमानतळाची उभारणी होत आहे. वैशिष्ठपूर्ण रचना असलेले हे विमानतळ पूर्ण क्षमतेनं सुरु झाल्यावर वर्षाकाठी सुमारे 90 दशलक्ष प्रवाशांची सोय होणार आहे. कमळाच्या (Lotus) आकाराचे हे विमानतळ पूर्ण झाल्यावर विशेष लक्षवेधी ठरणार हे नक्की. नवी मुंबईतील पनवेल येथील प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या डिझाईनसाठी कमळाच्या फुलापासून प्रेरणा घेण्यात आल्याचे यावेळी सूत्रांनी सांगितले. छत्रपती शिवाजी महाराज मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाची उभारणी ज्यांनी केली आहे त्याच जीव्हीके कंपनीला नव्या विमानतळाचं काम देण्यात आलं असून त्यांनी सांगितले की, या नवीन विमानतळाचा आकार कमळाच्या पाकळ्यांप्रमाणे तसेच लांब रेषांचा संगम असलेला असेल. तसेच मुख्य टर्मिनलशी (Main Terminal) अन्य बहुस्तरीय टर्मिनल जोडले जातील. यामुळे चालण्याचे अंतर कमी होईल. या विमानतळाच्या प्रस्तावित जागेवर यापूर्वी गावे आणि कमळांनी भरगच्च भरलेली तळी होती. या तळ्यांमधील कमळांपासून ही प्रेरणा मिळाल्याचे प्रस्तावित विमानतळाच्या पहिल्या लूकवरुन दिसते. 'नवी मुंबई विमानतळाला बाळासाहेबांचेच नाव, त्यात वाद नको' या विमानतळाचे डिझाईन ब्रिटीश आर्किटेक्चर फर्म झहा हदीद यांनी केले असून, या कंपनीने यापूर्वी बीजिंग डॅक्सिंग आंतरराष्ट्रीय विमानतळाची रचना केली आहे. दिल्ली आणि बंगळुरू येथील विमानतळांवर अतिरिक्त पायाभूत सुविधा निर्माण करण्यासोबतच नवी मुंबई विमानतळ 2021-22 मध्ये कार्यान्वित करण्याचे केंद्र सरकारचे नियोजन आहे, अशी माहिती नागरी उड्डाण राज्यमंत्री जयंत सिन्हा (Civil Aviation State Minister Jayant Sinha) यांनी नुकतीच दिली. पनवेल येथील हे ग्रीनफिल्ड विमानतळ चार टप्प्यात उभारले जाणार आहे. हे विमानतळ पूर्ण क्षमतेनं कार्यान्वित झाल्यानंतर वर्षाकाठी 90 दशलक्ष प्रवाशांची  सोय होणार आहे. टप्पावार विचार केला तर विमानतळाच्या पहिल्या टप्प्यात 10 दशलक्ष प्रवाश्यांची सोय होणार आहे. या विमानतळाच्या मुख्य टर्मिनलला (टी 1) तीन बहुस्तरीय टर्मिनल जोडले जातील. हे टर्मिनल पहिल्या टप्प्यात सुरु होण्याची शक्यता आहे. टी 1 मध्ये दोन मजले असतील, यातील स्तरांमध्ये फारसा बदल नसेल तर चालण्यासाठीचे अंतर देखील कमी असेल. ऑगस्ट 2020 मध्ये जीव्हीके समुहाने यातील आपला हिस्सा अदानी समूहाला (Adani Group) विकला आहे.
    Published by:Sunil Desale
    First published:

    Tags: Airport, Panvel

    पुढील बातम्या