Home /News /maharashtra /

Video : एक आदिवासी महिला राष्ट्रपतीपदाच्या शर्यतीत, दुसरीकडे महाराष्ट्रात जगण्यासाठी आदिवासींची जीवघेणी कसरत

Video : एक आदिवासी महिला राष्ट्रपतीपदाच्या शर्यतीत, दुसरीकडे महाराष्ट्रात जगण्यासाठी आदिवासींची जीवघेणी कसरत

धक्कादायक Video : येथे तर आदिवासींना (Surgana Tribal Area) मुलभूत सोयीसुविधा मिळणंही कठीण झालं आहे.

    नाशिक, 21 जुलै : नाशिकच्या आदिवासीबहुल सुरगाणा तालुक्यातील भेगू सावरपाडा येथील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी जीवघेणा प्रवास करावा लागत असून रस्ता नसल्याने चक्क विद्यार्थ्यांना शाळेत येण्या जाण्यासाठी केटीवेअर बंधाऱ्यावरून वाहणाऱ्या पुराच्या पाण्यातुन अशा प्रकारे जीवघेणा प्रवास करावा लागत आहे. एकीकडे आपल्या देशाच्या राष्ट्रपतीपदाच्या शर्यतीत आदिवासी महिला लढत आहे. त्याच राष्ट्रपदीपदावर विराजमान होतील असा विश्वासही व्यक्त केला जात असताना दुसरीकडे महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातील आदिवासी भागातील परिस्थिती भीषण आहे. नाशिकच्या आदिवासी बहुल भागांमध्ये पुराच्या पाण्यामुळे अनेक पूल पाण्याखाली गेले आहेत. तर पायवाटादेखील पाण्याखाली गेल्याने या भागातील नागरिकांचे मोठे हाल होत आहे. शेंयेथद्रीपाडा परिसरात होणाऱ्या महिलांची हाल लक्षात घेत तात्कालीन पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी या भागात तात्पुरता लोखंडी पूल बांधून दिला होता. मात्र हा पूल देखील आता पाण्याखली गेल्याने या महिलांची जीवघेणी कसरत पुन्हा सुरू झाली आहे. तर दुसरीकडे सुरगाणा तालुक्यातील शाळकरी मुलांची वाट पुराच्या पाण्याने अडवली आहे. या शाळकरी मुलांना दररोज शाळेत जाण्यासाठी पुराच्या पाण्यातून वाट शोधत जीवघेणी कसरत करावी लागत आहे. कळमणे, बेगू ,सावरपाडा, मदळपाडा, खिरमाणी आदी गावातील विद्यार्थ्यांची दररोज हिच अवस्था आहे. मात्र, प्रशासनाने याकडे सोईस्कर दुर्लक्ष केलं असून शाळेतील विद्यार्थ्यांसाठी कोणतेही संरक्षण नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ होताना दिसून येत आहे. एखादी घटना जीवावर बेतू शकते, याला जबाबदार कोण? असा सवाल ग्रामस्थांनी केला आहे. मात्र जिल्ह्याच्या नेत्यांनी याचं खापर त्याच नागरिकांवर फोडत रस्ता असताना देखील शॉर्टकट म्हणून हे लोक अशा प्रकारे जीव धोक्यात घालत असल्याचं भुजबळांनी म्हटलं आहे. भुजबळ यांनी दिलेली ही प्रतिक्रिया या नागरिकांच्या जखमेवर मीठ चोळणारी आहे. मात्र सत्ताधाऱ्यांनी आणि प्रशासनाने तरी या प्रकरणाची योग्य ती दखल घेऊन या ठिकाणी पूल बांधावा, अशी मागणी पालकांसह, ग्रामस्थानी केली आहे. ही जीवघेणी कसरत या गोरगरिबांच्या जीवावर बेतू नये हीच माफक अपेक्षा, अशी भावना लक्ष्मण घाटोळ यांनी व्यक्त केली आहे.
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Election, Nashik, President

    पुढील बातम्या