मालेगाव, 4 डिसेंबर : एकीकडे आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समृद्धी मार्गाची पाहणी करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाहनाचं सारथ्य केलं. त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या गाडीचं स्टेरिंग आपल्या हाती घेत भाजप आणि बाळासाहेबांची शिवसेना सोबत असल्याचा संदेश दिला. मात्र दुसरीकडे भाजप आणि शिंदे गटाच्या गोटात चिंता वाढवणारी बातमी समोर येत आहे. ती म्हणजे मालेगावात भाजप व शिंदे गटातील दुफळी समोर आली आहे. भाजपचे नेते अद्वय हिरे, सुनील आबा गायकवाड यांनी पालकमंत्री दादा भुसे यांच्या विरुद्ध दंड थोपटल्याचं पहायला मिळत आहे.
पालकमंत्रिपदावरून हटवण्याची मागणी
या आगोदरही भाजपचे नेते अद्वय हिरे, सुनील आबा गायकवाड यांनी दादा भुसे यांची पालकमंत्रिपदावरून हकालपट्टी करावी या मागणीसाठी आंदोलन केले होते. त्यानंतर त्यांनी आज दादा भुसे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. आज त्यांनी पोलीस ठाण्यात निवेदन देऊन भुसेंविरोधात आंदोलक शेतकऱ्याला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली आहे. मालेगावत निर्माण झालेल्या या दुफळीमुळे भाजप आणि शिंदे गटात चिंतेचं वातावरण आहे.
हेही वाचा : तेव्हाच महिलेला मुख्यमंत्रिपदाची संधी द्यायला हवी होती; निदान..., बच्चू कडू यांचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल
जुना संघर्ष
दरम्यान मालेगावात भाजप आणि दादा भुसे यांच्यातील हा संघर्ष नवा नाहीये. हा जुनाच संर्घष आहे. कोणतिही निवडणूक असो हे दोन गट कायमच एकमेंकाच्या विरोधात उभे ठाकले आहेत. राज्यात भाजपाची सत्ता आल्यानंतर सर्वांना वाटत होते हा वाद मिटेल, मात्र हा वाद आता आणखी चिरघळत चालला आहे. त्यामुळे आगामी काळात दोन्ही पक्षाचे वरिष्ठ नेते हा वाद मिटविण्यासाठी काय भूमिका घेतात याकडे केवळ मालेगावचं नव्हे तर नाशिक जिल्ह्यातील जनतेचे लक्ष लागले आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.