नाशिक, 15 जून : उन्हाळी सुट्टी संपून आता पुन्हा एकदा शाळेची घंटा वाजलीय. राज्यातील शाळा आजपासून सुरू झाल्या असून विद्यार्थ्यांच्या स्वागतासह प्रवेशोत्सव साजरा केला जात आहे. शाळांची मैदाने, वर्ग विद्यार्थ्यांनी फुलले आहेत. महिन्याभराहून अधिक काळ सुट्टीनंतर विद्यार्थी शाळेत आले आहेत. शाळांमध्ये सजावटही केली गेलीय. काही शाळांमध्ये विद्यार्थ्यांचे औक्षण करून आणि गुलाबपुष्प देऊन स्वागत केलं जात आहे. दरम्यान, निशाकमध्ये पहिल्याच दिवशी विद्यार्थी आणि पालकांवर आंदोलन करण्याची वेळ आलीय. याबाबत मिळालेली माहिती अशी की, नाशिकच्या भोसला स्कूलच्या शिशु विहार साळेत मोडकळीस आलेल्या इमारतीत विद्यार्थ्यांना बसवलं जातंय. विद्यार्थ्यांच्या फीमध्ये इमारत शुल्कही आकारले जाते. पण विद्यार्थ्यांना धोकादायक अशा इमारतीत बसवले जात असल्यानं नव्या इमारतीत त्यांना शिकवावे अशी मागणी संतप्त झालेल्या पालकांनी केलीय. घोड्यावर तर कुठे फुलांच्या पायघड्या घालून विद्यार्थ्यांचं स्वागत, शाळेचा पहिला दिवस कसा होता? एका बाजुला राज्यात शाळेतला पहिला दिवस मोठ्या उत्साहाने साजरा केला जात आहे. शाळा गजबजल्या असून विद्यार्थ्यांना पुस्तके, गणवेश वाटप केले जात आहे. पण भोसला स्कूलमध्ये वेगळंच चित्र दिसतंय. पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना आंदोलन करावं लागत आहे. इतकंच नव्हे तर विद्यार्थ्यांनी शाळेच्या प्रवेशद्वारावरच त्यांचा टिफिनही खाल्ला. शिक्षण मंत्र्यांनी दिल्यात शुभेच्छा राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दिपक केसरकर यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा संदेश दिला आहे. केसरकर म्हणाले, विद्यार्थी हे महाराष्ट्राचे भविष्यातील नेतृत्व आहेत. त्यांच्या हिताच्या दृष्टीने शासनाने विविध निर्णय घेतले आहेत. विद्यार्थ्यांच्या पाठीवरील दप्तराचे ओझे कमी करण्यात आले असून एकाच पुस्तकामध्ये सर्व विषयांचा अभ्यासक्रम समाविष्ट करण्यात आला आहे. याच पुस्तकात नोंदी घेण्यासाठी वह्यांची पाने देण्यात आली आहेत. सर्व विद्यार्थ्यांना गणवेश, बूट, सॉक्स देण्यात येणार आहेत. शेतीचे ज्ञान आवश्यक असल्याने यापुढे शेती विषय शिकविण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.