नाशिक, 16 जानेवारी : नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीवरून सध्या राजकारण चांगलंच तापलं आहे. सुधीर तांबे यांना काँग्रेसकडून उमदेवारी देण्यात आली होती, पण त्यांनी उमेदवारी जाहीर होऊनही अर्ज दाखल केला नाही, तर दुसरीकडे त्यांचे पुत्र सत्यजित तांबे यांनी अपक्ष उमेदवार म्हणून आपला अर्ज दाखल केला आहे. यामुळे काँग्रेसच्या गोटात खळबळ उडाली आहे. आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस असल्यानं हालचालींना वेग आला आहे. भाजपकडून ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न सुरू असून, याच पार्श्वभूमीवर गिरीश महाजन हे नाशिकमध्ये दाखल झाले आहेत.
सुधीर ताबेंवर कारवाई
बंडाच्या पार्श्वभूमीवर यापूर्वीच काँग्रेसने सुधीर तांबे यांच्यावर कारवाई केली आहे. तर सत्यजित तांबे हे अपक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणात आहेत. उमेदवारी अर्ज माघारी घेण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे सत्यजित तांबे हे आपला अर्ज माघारी घेणार की, इतर पक्षाच्या पाठिंब्यानं निवडणूक लढवणार हे पहाणं महत्त्वाचं ठरणार आहे. भाजपाकडून ही निवडणूक बिनविरोध करण्याचा प्रयत्न सुरू आहे, मात्र पाठिंबा कोणाला देणार याबाबत अद्यापही पक्षाची भूमिका गुलदस्त्यात आहे.
हेही वाचा : अखेर तिढा सुटला; नागपूर शिक्षक मतदारसंघ निवडणुकीबाबत 'मविआ'चा मोठा निर्णय
गिरीश महाजन नाशिकमध्ये
दुसरीकडे भाजप नेते आणि मंत्री गिरीश महाजन हे नाशिकमध्ये तळ ठोकून आहेत. निवडणूक बिनविरोध करण्याची जबाबदारी पक्षाने त्यांच्यावर सोपवल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे आता गिरीश महाजन हे नाशिक पदवीधर निवडणुकीची सुत्र हलवणार आहेत. सध्या तरी नाशिकमध्ये सत्यजित तांबे विरूद्ध शुभांगी पाटील अशी थेट लढत पहायला मिळण्याची शक्यता आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Nashik, Satyajit tambe