नाशिक, 22 जानेवारी : नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या निमित्ताने काँग्रेसमध्ये गोंधळ चव्हाट्यावर आला. सत्यजीत तांबे यांना 6 वर्षांसाठी पक्षातून निलंबित करण्यात आले आहे. मुलाला निलंबित केल्यामुळे मी दुखी आणि व्यथित आहे, असं म्हणत सुधीर तांबे यांनी आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली.
नाशिक पदवीधर मतदारसंघात तांबे पिता-पुत्रानी घेतलेल्या भूमिकेमुळे काँग्रेसवर मोठी नामुष्की ओढावली होती. त्यामुळे सत्यजीत तांबे यांचं पक्षातून 6 वर्षांसाठी निलंबन झालं आहे. पक्षाच्या कारवाईवर पहिल्यांदाच सुधीर तांबे बोलले.
('शिवसेना' डोंबिवलीकर कुटुंबीयांचीच, लेकीचं नावच ठेवलं शिवसेना!)
'इतकी वर्ष काम केलं, मुलाचं निलंबन केलं आहे. मी दुखी आणि व्यथित आहे. आम्ही आमची भूमिका लवकरच स्पष्ट करणार आहे. मी गेल्या 13 वर्षांपासून या मतदारसंघात काम करतोय, आम्ही सदैव लोकांच्या संपर्कात असतो. लोक आमचा विचार करतील आणि आम्हाला न्याय देतील. योग्य वेळी भूमिका मांडणार आहे' असं तांबे म्हणाले.
तसंच, 'आमची कुणाशीही चर्चा झालेली नाही. आम्ही काही पाठिंबा मागितला नाही, पण पक्षाने ज्या प्रकारे कारवाई केली आहे, त्यामुळे आम्ही दुखी आहोत' असं म्हणत तांबे यांनी भाजपकडे पाठिंबा मागितला नसल्याचं सांगितलं.
आमच्या श्वासात आणि रक्तात काँग्रेस - सत्यजीत तांबे
दरम्यान, निलंबनानंतर सत्यजीत तांबे यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे. काँग्रेसने केलेल्या कारवाईवर सत्यजीत तांबे यांनी नाराजी व्यक्त केली आहे. काँग्रेसमध्ये नियमांची पायामल्ली करून माझ्यावर कारवाई करण्यात आली आहे, योग्य वेळी मी यावर उत्तर देईन, असं सत्यजीत तांबे म्हणाले आहेत.
('त्या' पक्षांचा कार्यक्रम झाला आता शिंदे गट...; रोहित पवारांचा भाजपला खोचक टोला)
'देशभर मी काँग्रेस पक्षासाठी काम केलं, गेल्या 22 वर्षांपासून संघटनेसाठी माझं काम आहे. काँग्रेस हा लोकशाही मानणारा पक्ष आहे. पक्षांतर्गत प्रक्रिया आणि शिस्तपालन समितीचे नियम आहेत. सर्व नियमांची पायामल्ली केली गेली आहे. माझ्याकडे खुलासा न मागता माझ्यावर कारवाई करण्यात आली आहे,' अशी प्रतिक्रिया सत्यजीत तांबे यांनी दिली आहे.
2030 साली आपल्या कुटुंबाला काँग्रेसमध्ये 100 वर्ष पूर्ण होतील. आमच्या श्वासात आणि रक्तात काँग्रेस पक्ष आहे, पण अशी भूमिका घेताना दोन्ही बाजू समजून घ्यायला हव्या होत्या, दुर्दैवाने असं झालं नाही, असं म्हणत सत्यजीत तांबे यांनी त्यांची नाराजी बोलून दाखवली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: काँग्रेस