नाशिक 6 डिसेंबर : काही दिवसांपूर्वीपर्यंत बाईक राईड हा पुरुषांच्या मक्तेदारीचा विषय होता. पण, आता या क्षेत्रातही महिला उतरल्या असून त्या जिद्दीनं नवे विक्रम करत आहेत. नाशिकच्या दीपिका दुसाने देखील अशाच एक यशस्वी बाईक रायडर आहेत. त्यांनी तब्बल 21 हजार किलोमीटरची राईड करून संपूर्ण भारत भ्रमंती केलीय.
कधी झाली सुरूवात?
'आजादी का अमृत महोत्सव' या कार्यक्रमाच्या अंतर्गत बाईक रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं. यामध्ये देशभरातील 75 जण सहभागी झाले होते. त्यामध्ये महाराष्ट्रातून दीपिका यांचा सहभाग होता. विशेष म्हणजे दीपिका यांना जुळी मुलं, पती, सासू-सासरे असा परिवार आहे. संसाराचा हा गाडा सांभाळत त्यांनी बाईक राईडचा छंद जोपासला आहे. या भारत भ्रमंतीच्या दरम्यान त्यांना अनेक अडचणी आल्या, पण त्यावर मात करत दीपिका यांनी 75 दिवसांमध्ये त्यांचं लक्ष्य पूर्ण केलं.
'या' राज्यांमधून प्रवास
9 सप्टेंबर 2022 रोजी मेजर ध्यानचंद स्टेडियम दिल्ली येथून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी या बाईक रॅलीला हिरवा झेंडा दाखवत सुरुवात झाली. त्यानंतर चंदीगड,अमृतसर, लेह लदाख, उत्तराखंड, उत्तर प्रदेश, बिहार,सिक्कीम, आसाम, अरुणाचल प्रदेश, नागालँड, मणिपूर, मिझोरम, त्रिपुरा, मेघालय, पश्चिम बंगाल, झारखंड, ओडिशा, आंध्र प्रदेश, तामिळनाडू, केरळ, कर्नाटक, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, गुजरात, राजस्थान आणि पुन्हा दिल्ली असा संपूर्ण भारताचा प्रवास त्यांनी केला.
24 नोव्हेंबर 2022 रोजी प्रवासाची दिल्ली येथे जवाहरलाल नेहरू स्टेडियम मध्ये सांगता झाली.सलग 75 दिवस संपूर्ण भारत आणि इतक्या मोठ्या प्रमाणावर बायकर्स हा एक इतिहास आहे. या इतिहासात दीपिका यांची नोंद झाली आहे.
अडचणींवर मात
'हा प्रवास अतिशय खडतर होता ऊन वारा पाऊस थंडी आणि अशा या सर्व प्रकारच्या वातावरणात या सर्व बायकर्सने फिट इंडिया या स्लोगन्सचा जोरदार प्रचार आणि प्रसार केला.भारत सरकारतर्फे स्पोर्ट्स ऑथॉरिटी ऑफ इंडिया आणि फिट इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने या रायडर्सचे प्रत्येक राज्यात जल्लोषाने स्वागत केले जात होते. काही राज्यांमध्ये रस्ते खराब होते.तिथं काहीसा त्रास झाला, त्यानंतरही आमचा प्रवास सुरू होता,' असं दीपिका यांनी सांगितलं.
मुंबईकर मेधानं बाईकवर केला 25 हजार किलोमीटर प्रवास, पाकिस्तानबद्दल म्हणाली... Video
सहकाऱ्याचं निधन
'भारत भ्रमंतीच्या दरम्यान एक दु:खद अनुभवही दीपिका यांना आला. लेहमधील आर्मी कॅम्पमध्ये त्यांच्या टीममधील कोलकाताचे सहकारी तरुण विश्वास यांचा हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाला. त्यानंतर त्यांना श्रद्धांजली अर्पित करत हा प्रवास असाच पुढे चालू ठेवण्याचा आम्ही सर्व बायकर्सने निर्णय घेतला. त्यांचे हेल्मेट गाडीला बांधून हा संपूर्ण भारताचा प्रवास पूर्ण केला. हीच त्यांना वाहिलेली खरी श्रद्धांजली ठरली,' असा अनुभव दीपिका यांनी सांगितला.
'या भ्रमंतीच्या दरम्यान दसरा, दिवाळीसारखे मोठे सण आले. त्यावेळी मला माझ्या मुलांची आठवण येत असे. त्यावेळी अश्रूंना मोकळी वाट करून देण्या व्यतिरिक्त कोणताही मार्ग माझ्यासमोर नव्हता. वेळोवेळी मुलांना व्हिडिओ कॉल करून त्यांच्याशी गप्पा मारत होते. या सर्व प्रवासात माझ्या पतीने माझी खंबीरपणाने साथ दिली. माझ्या सासू-सासर्यांनी मी नसताना माझ्या मुलांची अतिशय प्रेमाने देखरेख केली.
युनायटेड नेशन फेलोशिपसाठी आशिया खंडातून फक्त नाशिकच्या मुलीची निवड, Video
नवीन पिढीसाठी पुष्कळ संधी उपलब्ध असतात. या संधीचा योग्य फायदा उचलता आला पाहिजे. स्वतःवर आणि स्वतःच्या स्वप्नांवरती विश्वास हवा. प्रत्येक स्त्री ही कोणतेही आवाहन पेलण्यास सक्षम असते, याची जाणीव करून देण्यासाठी मी हा छोटासा प्रयत्न केला. मी माझ्यासारख्या आणखी गृहिणींना सक्षम बनवू शकेल,' असा विश्वास दीपिका यांनी व्यक्त केला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bike riding, Local18, Nashik