मुंबई, 1 डिसेंबर : ती मुंबईची तर तो जर्मनीचा. दोघं एकमेकांच्या प्रेमात पडले. त्यानंतर त्यांनी लग्नही केलं. लग्नानंतर माहेरी येण्यासाठी तिला विमान प्रवास हा जलद आणि सोपा मार्ग उपलब्ध होता. पण, सर्वांप्रमाणे धोपटमार्गावरचा प्रवास त्यांना मान्य नव्हता. तिनं बाईकहून माहेरी जाण्याचं ठरवलं. तिच्या या कल्पनेला नवऱ्यानंही साथ दिली. त्यानंतर या दोघांनी बाईकवर 18 देशातून 25 हजार किलोमीटर प्रवास तब्बल 156 दिवसांमध्ये पूर्ण केला. या प्रवासात त्यांना अनेक थराराक अनुभव आले. विशेषत: इराण आणि पाकिस्तानमधील अनुभव हे जोडपं कधीही विसरू शकणार नाही.
जर्मनी ते भाईंदर
मुंबईतल्या भाईंदरमध्ये राहणाऱ्या मेधा राय यांनी नुकताच हा थरारक प्रवास पूर्ण केला आहे. मेधा गेल्या 7 वर्षांपासून जर्मनीत राहातात. त्यांनी मुंबई विद्यापीठातून अभियांत्रिकीची पदवी पूर्ण केली आहे. शिक्षण झाल्यानंतरच त्या नोकरीच्या निमित्तानं जर्मनीत गेल्या.
मेधा यांचे पती हॉक व्हिक्टर हे काही कारणांसाठी भारतामध्ये आले होते, तेव्हा त्यांची ओळख झाली. त्यानंतर मार्च महिन्यात त्यांनी जर्मनीत कोर्ट मॅरेज केलं. कोरोना काळातील निर्बांधामुळे मेधा यांच्या माहेरची मंडळी उपस्थित राहू शकले नाहीत. त्यामुळे त्यांना भेटण्यासाठी दोघांनी भारतामध्ये जाण्याचं ठरवलं.
कशी सुचली आयडिया?
जर्मनीतून मुंबईत येण्यासाठी 12 तासांचा विमान प्रवास हा सोपा पर्याय त्यांना होता. जगातील दोन टोकांचा या प्रवासाचा अनुभव घेण्याची या दाम्पत्याची इच्छा होती. त्यामुळे त्यांनी बाईकनं हा सर्व प्रवास करण्याचं ठरवलं. हा प्रवास सुरू करण्यापूर्वी मेधा यांनी बाईक चालवण्याचा नियमित सराव केला, तसंच दुचाकीचा परवाना मिळवला. 18 देशांमधून जाणारा 25 हजार किलोमीटरचा हा प्रवास त्यांनी 156 दिवसांमध्ये पूर्ण केला. भाईंदरमध्ये मेधा त्यांच्या पतीसह दाखल झाल्यानंतर त्यांचं सर्वांनी जंगी स्वागत केलं.
आठव्या वर्षीच एव्हरेस्टचा बेस कॅम्प सर करणाऱ्या गृहिताच्या यशाचं रहस्य काय? Video
पाकिस्तानात काय घडलं?
मेधा यांना या प्रवासात पाकिस्तानमधूनही यावं लागलं. इराणची बॉर्डर पार केल्यानंतर त्या पाकिस्तानमधील बलुचिस्तान प्रांतामध्ये आल्या. त्या भागात अतिरेक्यांनी यापूर्वी विदेशी पर्यटकांचं अपहरण केलं होतं. दहशतवादाच्या प्रभावक्षेत्रामुळे बदनाम असलेल्या या प्रदेशात पाकिस्तान सरकारनं आपल्याला चोख सुरक्षा दिली. आम्ही 24 तास पोलिसांसोबत होतो. त्यांच्याच वाहनांना फॉलो करत होतो. त्यांच्यासोबतच जेवलो. पोलीस स्टेशनमध्येच आमचा मुक्काम असे. असा अनुभव मेधा यांनी सांगितला.
या संपूर्ण प्रवासात आम्हाला इराणमध्ये सर्वात जास्त भीती वाटली. आमच्या राहण्याच्या ठिकाणापासून 200 मीटर अंतरावर दहशतवादी हल्ला झाला होता. त्यावेळी मी आणि हॉक सुदैवानं बाजारात असल्यानं या हल्ल्यातून वाचलो, असं मेधा यांनी सांगितलं.
कुर्ल्यातील 139 वर्ष जुन्या मंदिराच्या यात्रेला सुरूवात, पाहा Video
कसा झाला प्रवास?
मेधा आणि हॉक यांनी जर्मनीतल्या मेडब्ली शहरातून 26 जून रोजी प्रवास सुरू केला. जर्मनी, डेन्मार्क, नॉर्वे, ऑस्ट्रिया, झेक प्रजासत्ताक, क्रोएशिया, बोस्निया हर्जेगोविना, अल्बेनिया, मॉन्टेनेग्रो, ग्रीस, टर्की, जॉर्जिया, आर्मेनिया, इराण, पाकिस्तान आणि शेवटी 26 नोव्हेंबर रोजी त्या मुंबईत भाईंदरमध्ये माहेरी पोहचल्या. हा प्रवास करतांना खूप काही बघायला तसचं शिकायला मिळालं. हा प्रवास माझा कायम लक्षात राहील, असं मेधा यांचे पती हॉक यांनी सांगितलं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.