नाशिक, 26 ऑगस्ट : नाशिक जिल्ह्याच्या निफाड तालुक्यातील शिरवाडे वणी येथे पत्नीच्या माहेरीच पतीने किरकोळ वादातून पत्नीचा खून केल्याची घटना घडली आहे. (nashik crime) यामुळे शिरवाडे परिसरात खळबळ माजली आहे. खून करून संशयित पती फरार झाला असून याबाबत पिंपळगाव पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान दोघांमध्ये किरकोळ कारणावरून वाद सुरू होता या वादात त्याने हे टोकाचे पाऊल उचलल्याचे प्राथमिक माहितीनुसार समजते आहे.
याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार, दिंडोरी तालुक्यातील एकलहरे येथील जान्हवी नामदेव महाले ही आपल्या माहेरी निफाड तालुक्यातील शिरवाडे वणी आली होती. ती आपला पती नामदेव उत्तम महाले यांच्यासोबत आली होती. त्यात तिचे आणि तिच्या पतीचे किरकोळ वाद झाले. त्या वादाचे रूपांतर जोरदार भांडणात झाल्याने पत्नी जान्हवी महाले (वय 24) हिला नामदेव याने डोक्यात दांड्याने मारले. नामदेव याने मारलेला घाव इतक्या जोरात होता की ती जाग्यावर गंभीर जखमी झाली होती.
हे ही वाचा : पोळ्यासाठी बैल धुण्याकरता तलावाजवळ गेले अन् तिथेच मृत्यूनं गाठलं; काका-पुतण्याचा हृदयद्रावक अंत
तिच्या डोक्यात जबर मार लागल्याने तिचा जागीच मृत्य झाला. पत्नी मयत झाल्याचे लक्षात येताच संशयित आरोपी नामदेव उत्तम महाले राहणार एकलहरे हा घटनास्थळावून फरार झाला. या घटनेची माहिती लागताच अशोक बाळू वाघ यांनी पिंपळगाव पोलीस ठाण्यात धाव घेत गुन्हा दाखल केला. त्यांच्या फिर्यादीवरून पिंपळगाव बसवंत निरीक्षक भाऊसाहेब पठारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस सहाय्यक निरीक्षक कुणाल सपकाळे फरार आरोपीचा शोध घेत आहेत.
नाशिक जिल्ह्यात गुन्हेगारीच्या प्रमाणात वाढ
नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यात कादवा नदी पुलावर विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ. बी. जी. शेखर यांच्या पथकाने 10 लाखांचा 200 किलो गांजा पकडला. बुधवारी मध्यरात्री ही कारवाई करण्यात आली. कारवाई करणाऱ्या पथकामध्ये जळगावच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.
हे ही वाचा : Monsoon Rain Update : शेतकऱ्यांना मोठा फटका बसणार, यंदा मान्सून लवकर जाणार हवामान विभागाची सूचना
डॉ. शेखर यांनी नाशिक परिक्षेत्रातील अवैध धंद्यांवर कारवाईसाठी नेमलेल्या पथकाला गांजा तस्करी संदर्भात गोपनीय माहिती मिळाली होती. त्यानुसार पथकाने निफाड पोलिस ठाणे हद्दीतील शांतीनगर त्रिफुलीजवळ कादवा नदी पुलाजवळ सापळा रचला होता.