नाशिक, 22 सप्टेंबर : नाशिक दौऱ्यावर असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत असलेल्या आमदारांबाबत मोठा दावा केला आहे. ‘कुठून आम्हाला अवदसा आठवली आणि नादाला लागलो, असं काही आमदार आम्हाला खासगीमध्ये म्हणतात. आमदार फार नाराज आणि निराश झाले आहेत,’ असं जयंत पाटील म्हणाले आहेत. आदित्य ठाकरे या 40 आमदारांच्या मतदारसंघात गेल्यानंतर त्यांच्या पायाखालची वाळू हललेली आहे. पुढच्या वेळी निवडून येणं अवघड आहे, हे काही करायची गरज नव्हती, असं ते म्हणत आहेत, असं वक्तव्य जयंत पाटील यांनी केलं आहे. ‘सरकारवर डिसक्वालिफिकेशनची टांगती तलवार आहे. सुप्रीम कोर्ट 40 आमदारांचं निलंबन कधीही करू शकतं. 10व्या शेड्युलनुसार हे करावंच लागेल. दुसरीकडे शिवसेना आमच्या ताब्यात आहे आणि चिन्हा आम्हालाच मिळावं, यासाठी त्यांचा प्रयत्न सुरू आहे, त्यामुळे सुप्रीम कोर्ट आणि निवडणूक आयोग यांच्यामुळे यांना दुसरं काही काम करायला संधी आणि वेळच मिळत नाही,’ असा टोला जयंत पाटील यांनी हाणला. ‘एकनाथ शिंदेंसोबत असलेल्या सगळ्या 40 जणांना मंत्री व्हायचं आहे, त्यामुळे एकनाथ शिंदे अडचणीत आहेत. 106 आमदार असणाऱ्यांना उपमुख्यमंत्री व्हावं लागलं, त्यामुळे ते सगळे 106 आमदार नाराज आहेत. राजी-नाराजी प्रचंड आहे, सरकार अस्थिर आहे. हे सरकार फार काळ टिकणार नाही, हे प्रशासनालाही माहिती आहे, त्यामुळे प्रशासनाचे अधिकारीही याचं ऐकत नाहीत,’ असा आरोप जयंत पाटील यांनी केला आहे. अर्थमंत्र्यांच्या दौऱ्यावर टोमणा बारामती मतदार संघाचा विकास कॉपी करण्यासाठीच केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण बारामती दौऱ्यावर आल्या आहेत, असा टोमणा जयंत पाटील यांनी लगावला आहे. निर्मला सीतारामन यांनी बारामतीचा विकास पाहण्यासाठीच हा मतदार संघ मागून घेतला. आपण देशाचे अर्थमंत्री आहोत, बारामतीचा विकास हळूच जाऊन पहावा आणि आपल्याला जी संधी आहे, त्याचा उपयोग करून तसाच विकास आपल्या मतदार संघात करावा, असा मानस घेऊन त्या बारामतीत येत आहेत. आम्ही त्यांचं स्वागत करत असल्याचं जयंत पाटील यांनी म्हटलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.