नाशिक, 30 मार्च : राज्याच्या राजकारणामध्ये कधी काय होईल याचा नेम राहिला नाही. एकीकडे शिवसेना फोडून एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री झाले आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादीमध्ये अजितदादांच्या मुख्यमंत्रिपदासाठी कार्यकर्ते देव पाण्यात ठेवून आहे. आज पुन्हा एकदा नाशिकमध्ये अजित पवार भावी मुख्यमंत्री असे बॅनर भरसभेत झळकले आहे. या बॅनरवरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी भाष्य केलं आहे. नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यात शेतकरी मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यात खुद्द अजित पवार आणि जितेंद्र आव्हाड हे उपस्थितीत आहे. यावेळी आव्हाड बोलत होते.
काय म्हणाले जितेंद्र आव्हाड? मुख्यमंत्री कुठेही गेले तरी म्हणतात सहा महिन्यापूर्वी मी बॅटिंग केली. पण तुम्ही खंजीर खुपसला. महिलेला बाजूला सरकावले तरी 354, आमच्या मुलांनी फटके मारले तर 307 असा न्याय सुरू आहे. 50 खोके म्हटलेले तुम्हाला का लागतय? असं म्हणत आव्हाड यांनी 50 खोकेच्या घोषणा दिल्या. जनता वाट बघते आहे कधी निवडणुका लागतात, कधी तुम्ही मैदानात येता. यावेळी निवडणुका लागू द्या मग अजित दादा मुख्यमंत्री होतील, असं वक्तव्य आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केलं आहे. वाचा - पंतप्रधानांची भेट घेऊन आले आणि…, केसरकरांनी उद्धव ठाकरेंची ‘अंदर की बात’ केली उघड महाराष्ट्राची परिस्थिती अत्यंत वाईट आहे. सर्वोच्च न्यायालयाने राज्याबद्दल काय म्हटले? हे सरकार नपुंसक आहे. जाती धर्मात तेढ लावून आपले हित साध्य करायचे काम सुरू आहे. वर मोदीसाहेब, खाली फडणवीस-शिंदे साहेब हिंदुत्ववादी आहे. हिंदूंना भडकवण्यासाठी हिंदू मोर्चा निघत आहेत. अजित दादा किंवा आम्ही सत्तेत असताना असे कधी झाले का? तुमच्या सरकारमध्ये हिंदू सुरक्षित नाही असे का? परत उद्धव साहेबांना मुख्यमंत्री आणि अजित दादांना उपमुख्यमंत्री करा, अशी मागणीही आव्हाड यांनी केली. काही दिवसांपूर्वी मुंबईतल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयाबाहेर अजित पवार भावी मुख्यमंत्री असा पोस्टर लावण्यात आलं होतं. याआधी मुंबईत जयंत पाटील भावी मुख्यमंत्री असे पोस्टरही लावण्यात आले होतं, यानंतर आता अजित पवारांसाठीचे पोस्टर लावण्यात आल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले होतं.