जळगाव, 11 जानेवारी : राज्यभरात थंडीचा कडाका वाढू लागला असून जळगावचे किमान तापमान 5अंशापर्यंत खाली आल्यामुळे जनजीवनावर मोठा परिणाम दिसून आला. याआधी जळगाव शहराचे किमान तापमान 2011 मध्ये 2 अंशापर्यंत खाली आले होते. त्यानंतर तब्बल 12 वर्षांनी जळगाव शहरात सर्वांत कमी म्हणजेच 5 अंशाची नोंद झाली आहे. जानेवारी 2022 मध्ये जळगाव शहराचा पारा 5.2 अंशापर्यंत खाली घसरला होता.
यंदा हवामान विभागाने कडाक्याच्या थंडीचा अंदाज व्यक्त केला होता. मात्र, नोव्हेंबर महिन्यात केवळ तीन ते चार दिवस पारा 10 अंशापेक्षा कमी झाला तर डिसेंबर महिन्यातदेखील बहुतांश ढगाळ वातावरण राहिल्यामुळे थंडी गायबच होती. मात्र, नवीन वर्षानंतर म्हणजेच 1 जानेवारीपासून जिल्ह्यात थंडीचे जोरदार कमबॅक झाले असून, जानेवारी महिन्यात किमान तापमानाची सरासरी 10 अंशापर्यंत खाली आली. गेल्या पाच वर्षोत जानेवारी महिन्यातील तापमानाची सरासरी ही 13 अंश इतकी होती.
हे ही वाचा : बाहेर पडताना काळजी घ्या! कानपूरमध्ये एका दिवसात हार्ट अॅटॅकनं तब्बल 21 मृत्यू, महत्त्वाचं कारण समोर
मात्र, यंदा ही सरासरी 3 अंशानी कमी झाली आहे. दरम्यान, कडाक्याच्या थंडीमुळे जनजीवनावर देखील परिणाम होत असून, थंडीपासून बचावासाठी शेकोट्या पेटविल्या जात आहेत, तसेच सकाळपासूनच शहराच्या रस्त्यांवर शुकशुकाट पाहायला मिळत आहे. तीव्र शीतलहरीची शक्यता येत्या 48 तासांत जळगाव जिल्ह्यातील काही भागात थंडीची लाट ते तीव्र शीतलहरीची शक्यता असल्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे.
राज्यातील 20 जिल्ह्यात थंडीचा कडाका
राज्यातील विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रात बुधवारपासून अनेक ठिकाणी तापमानात आणखी 3 ते 4 अंशाने घट होणार आहे. तर कोल्हापूर, सातारा, पुणे, उत्तर महाराष्ट्र, मराठवाड्यात थंडीचा कडाका अधिक राहणार असल्याचा अंदाज हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी वर्तवला आहे. याचबरोबर मुंबईतही तापमान घटनार आहे. तर कोकणातील काही जिल्ह्यात दिवसा उन्हाचा चटका तर रात्री काही प्रमाणात गारवा जाणवण्याची शक्यता आहे. थंडी जोरदार पडल्याने शेतकऱ्यांना आपली कामे ही उशीरा करण्याची वेळ येत आहे.
हे ही वाचा : राज्यात पुढचे 48 तास महत्वाचे; थंडीची लाट आणखी तीव्र होणार, मुंबई, पुण्यात पारा घसरला
राज्यात मागच्या 24 तासांत मंगळवारी बहुतेक ठिकाणी किमान तापमानात 1 अंशाने घसरण झाली. राज्यातील 10 शहरांतील पारा दहा अंशाखाली होता. नाशिक जिल्ह्यातील ओझरला पुन्हा राज्यातील नीचांकी 4.9 अंश सेल्सियस तापमानाची नोंद करण्यात आली. नाशकात पारा7.6 तर औरंगाबादेत 7.7 वर होता. गेल्या दोन दिवसांपासून उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील पारा दहा अंशाखाली आला आहे. बुधवारपासून मुंबईसह कोकणातही नागरिकांना थंडीचा सामना करावा लागणार आहे.