नाशिक, 29 डिसेंबर: नाशिक (Nashik) जिल्ह्यातील देवळाली कॅम्प येथील स्कूल ऑफ आर्टिलरी (School of artillery) परिसरात लष्करी अधिकारी असल्याचं सांगून फिरणाऱ्या एका तोतया अधिकाऱ्याला पोलिसांनी अटक (Fake army officer arrested) केली आहे. गेल्या बऱ्याच दिवसांपासून हा तोतया व्यक्ती अतिसंवेदनशील लष्करी परिसरात फिरत असावा, असा संशय पोलिसांकडून व्यक्त करण्यात आला आहे. संबंधित तोतया अधिकाऱ्याकडे लष्कराच्या कँटीनचे कार्ड तसेच त्याच्या गाडीवर लष्कराचा लोगो देखील आढळला आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली असून मंगळवारी रात्री उशिरापर्यंत त्याच्यावर गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू होतं.
गणेश पवार असं अटक करण्यात आलेल्या 26 वर्षीय तोतया अधिकाऱ्याचं नाव आहे. तो चांदवड तालुक्यातील हरसूल येथील रहिवासी असल्याची माहिती दिली आहे. शिवाय तो काही दिवस नांदुकरनाका येथे वास्तव्याला असल्याचंही त्याने सांगितलं आहे. ही माहिती मिळताच दोन्ही ठिकाणी पोलीस पथक रावाना झालं आहे. आर्मी इंटेलिजन्स ब्युरोच्या पथकाने या इसमाला ताब्यात घेतलं असून या घटनेचा कसून तपास केला जात आहे.
हेही वाचा-मूल होत नसल्याने सुनेसोबत सासऱ्याचं विकृत कृत्य; माणुसकीला हादरवणारी घटना
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी गणेश पवार हा मंगळवारी रात्री लष्करी अधिकारी असल्याचं सांगून देवळाली कॅम्प परिसरातील स्कूल ऑफ आर्टिलरी परिसरात फिरत होता. यावेळी येथील काही अधिकाऱ्यांना संशय आल्याने त्यांनी गणेश पवार याला अडवून चौकशी केली. चौकशी सुरू असताना त्याने उडवाउडवीची उत्तरं दिली. यातून बिंग फुटताच अधिकाऱ्यांनी त्याला ताब्यात घेतलं. यानंतर लष्करी अधिकाऱ्यांनी या घटनेची माहिती देवळाली कॅम्प पोलिसांना दिली.
हेही वाचा-10 वर्षांचा संसार क्षणात मोडला; प्रेमात आंधळ्या झालेल्या महिलेनं पतीचा घेतला जीव
आरोपीकडे संरक्षण खात्याचे कँटीन कार्ड तसेच लष्कराचा गणवेश आढळला आहे. त्याचबरोबर त्याच्या गाडीवर देखील लष्कराचा लोगो आढळला आहे. असं करण्यामागे आरोपीचा नेमका उद्देश काय होता? याची कोणतीही माहिती अद्याप समोर आली नाही. आरोपीचा कसून तपास केला जात आहे. लष्करी कॅम्प सारख्या संवेदनशील परिसरात हा प्रकार घडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Crime news, Nashik