नाशिक, 20 फेब्रुवारी : शिवसेनेचं पक्षाचं नाव आणि चिन्ह शिंदे गटाला देण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने दिला आहे. या निर्णयानंतर उद्धव ठाकरे गट आणि शिंदे गटामध्ये वाद शिगेला पोहोचले आहे. खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबद्दल अपशब्द वापरले होते. या प्रकरणी राऊत यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर खालच्या स्तरावर जाऊन टीका केली होती. या प्रकरणी नाशिकमधील पंचवटी पोलीस स्टेशनमध्ये संजय राऊत यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुख्यमंत्र्यांची बदनामी केली म्हणून हा गुन्हा दाखल केला आहे. (‘उद्धव ठाकरेंकडे ब्लू टिकही राहणार नाही’, भाजपने सांगितलं भविष्य!) शिवसेनेचे शिंदेगट पदाधिकारी योगेश बेलदार यांच्या तक्रारीनंतर पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. कलम 500 नुसार संजय राऊत यांच्या विरोधात बदनामी केल्याचा गुन्हा नोंदवला आहे. संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत मुख्यमंत्र्यांबाबत चाटूगीरी हा शब्द वापरला होता. मुख्यमंत्र्यांबाबत चाटूगिरी शब्द वापरल्याने त्यांची बदनामी झाल्याच तक्रारीत नमूद केले आहे. दरम्यान, शिवसेना नाव आणि धनुष्यबाण उद्धव ठाकरे यांच्या ताब्यातून शिंदे गटाकडे गेलं आहे. उद्धव ठाकरेंनी या निर्णयावरून निवडणूक आयोगावर जोरदार टीका केली आहे. तर संजय राऊत यांनी ट्वीट करून खळबळजनक आरोप केला. (Shivsena : ठाकरेंसाठी किल्ला लढवणारे कपिल सिब्बल एका सुनावणीसाठी घेतात इतकी फी!) ‘माझी खात्रीची माहिती आहे. चिन्ह आणि नाव मिळवण्यासाठी आतापर्यंत 2000 कोटींचा सौदा आणि व्यवहार झाले आहेत’, असा आरोप राऊतांनी केला आहे. ‘हा प्राथमिक आकडा आहे आणि 100 टक्के सत्य आहे. बऱ्याच गोष्टी लवकरच उघड होतील. देशाच्या इतिहासात असे कधीच घडले नव्हते’, असा इशाराही राऊतांनी दिला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.