निलेश पवार, प्रतिनिधी
नंदुरबार, 24 नोव्हेंबर : दिवाळीच्या दिवसांमध्ये थेट दिवसाढवळ्या घरफोड्या करुन पोलिसांना (Nandurbar Police) आव्हान देणाऱ्या एका आंतरराज्य टोळीला (Interstate gang of thieves) जेरबंद करण्यात पोलिसांना यश आलं आहे. या टोळीकडून चार गुन्हांची उकल करण्यात आली आहे. त्यांच्याकडून चोरी केलेला 13 लाख 77 हजारांचा मुद्देमाल देखील जप्त करण्यात आला आहे.
नंदुरबार शहरात दिवाळी काळात बंद घरांची रेकी करुन त्यांची घरफोडी करणाऱ्या टोळीने थेट पोलिसांच्या नाकात दम आणला होता. या टोळीने दिवसाढवळ्या घरफोड्या करुन पोलिसांना थेट आव्हानच दिलं होतं. दरम्यान 10 नोव्हेबंरला घरफोडी करुन पसार होणाऱ्या या टोळीचा पोलीसांनी पाठलाग करुन त्यांच्या वाहनाला सारंगखेडा येथे धडक देऊन त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला. मात्र रात्रीची वेळी आणि शेताचा सहारा घेत हे घरफोडी करणारे गुन्हेगार पोबारा झाले होते.
हेही वाचा : EXCLUSIVE : 'पगारवाढ केली, आता संप मागे घेतला नाही तर..', अनिल परबांचा एसटी कर्मचाऱ्यांना इशारा
आरोपी पळून गेले पण त्यांची गाडी पोलिसांच्या हाती लागली होती. पोलिसांना या गाडीत चोरांच्या लसीकरणाचं प्रमाणपत्र मिळालं. याच प्रमाणपत्राचा तपास करताना आरोपींचा छडा लावण्यासाठी नंदुरबार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने दोन टीम रवाना केल्या होत्या. अखेर सलग 15 दिवस मध्यप्रदेशमधील इंदोर आणि पुणे येथे तळ ठोकल्यानंतर या अट्टल चोरांच्या टोळीतील दोघांना बेड्या ठोकण्यात पोलिसांना यश आलं.
हेही वाचा : पगारवाढीची घोषणा केली, पण तरीही कर्मचाऱ्यांचा एल्गार सरुच, विलीनीकरणाशिवाय मागे हटणार नसल्याची भूमिका
शैलेंद्र विश्वकर्मा आणि संतोष सिंग असे या घरफोडी करणाऱ्यांची नावे आहेत. यातील शैलेद्र विश्वकर्मावर मध्यप्रदेश, महाराष्ट्र आणि तेलांगणा राज्यात घरफोडीचे 63 गुन्हे दाखल आहेत. तर संतोष सिंग हा खुणाच्या गुन्हात 14 वर्षांची शिक्षा भोगून आलेला आहे. या आरोपींकडून चार घरफोडीतील 13 लाख 77 हजार 335 रुपयांचा मुद्देमाल देखील जप्त करण्यात आला आहे.
या आरोपीतांकडून आणखी काही गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान पोलीस अधिक्षक पी आर पाटील यांनी आज या गुन्ह्याची उकल केल्याबद्दल स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाल बक्षीस जाहीर केले आहे. तसेच ज्या नागरीक आणि व्यापाऱ्यांना शक्य आहे त्यांनी तरी आपल्या घर, व्यापारी प्रतिष्ठाणांबाहेर सीसीटीव्ही लावावे, असे आवाहन त्यांनी केले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.