नागपूर, 22 मार्च : नागपुरातून मोठी बातमी समोर येत आहे. मंगळवारी पुन्हा एकदा नितीन गडकरी यांच्या जनसंपर्क कार्यालयात फोन करून दहा कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी करण्यात आली होती. खंडणी न दिल्यास जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. या प्रकरणात आता एका तरुणीला मेंगलोर पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतलं आहे. नागपूर पोलिसांची एक टीम तातडीने बेळगावला रवाना झाली आहे. या प्रकरणात नागपुरातल्या धंतोली पोलीस स्टेशनमध्ये जीवे मारण्याची धमकी तसेच खंडणी प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
काय आहे नेमकं प्रकरण?
मंगळवारी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या कार्यालयात पुन्हा एकदा धमकीचा फोन आला आहे. दोन महिन्यांपूर्वी असाच एक कॉल त्यांच्या कार्यालयात आला होता. गडकरी यांना आलेल्या धमकीमुळे राज्यातील यंत्रणा सतर्क झाली आहे. मंगळवारी सकाळी नितीन गडकरी यांच्या जनसंपर्क कार्यालयात धमकीचे तीन फोन आल्याची माहिती समोर आली आहे. धमकी देणाऱ्याने आपलं नाव जयेश पुजारी असल्याचं सांगितलं. पुन्हा एकदा गडकरी यांना जयेश पुजारी या नावानेच धमकी आली आहे. फोनवर बोलणाऱ्या व्यक्तीनं 10 कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी केली आहे.
आज शिवाजी पार्कवर 'राज गर्जना'; मनसेच्या पाडवा मेळाव्याकडं राज्याचं लक्ष
धमकी प्रकरणात तरुणी ताब्यात
दरम्यान गडकरी यांच्या कार्यालयात फोन करून धमकी देणाऱ्या व्यक्तीनं एक नंबर दिला होता. या नंबरवर दहा कोटी रुपयांची खंडणी पाठवावी असं त्याने म्हटलं होतं. हा नंबर एका तरुणीचा आहे. ही तरुणी बंगळुरू येथील एका इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीत काम करते, तिचा एक मित्र कारागृहात असल्याची माहिती समोर येत आहे. आता या तरुणीला चौकशीसाठी मेंगलोर पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Nitin gadkari