विशाल देवकर, प्रतिनिधी नागपूर, 7 फेब्रुवारी : प्रसंग कितीही बाका असला तरी जे जिद्दीने आव्हानांना भीडतात विजयश्री त्यांच्याच गळ्यात विजयाची माळ घालते. असाच काहीसा प्रेरणादायी प्रवास विदर्भातील बुलढाणा जिल्ह्यातील एका शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या पोराचा आहे. पिंप्री खंदारे या लहानशा खेड्यातील राजू केंद्रे यांनी आपली महत्त्वाकांक्षा आणि कष्टाच्या जोरावर मोठ्या यशाला गवसणी घातली आहे. अपयशातून न खचता आपला प्रवास अखंड सुरू ठेवणाऱ्या राजू यांनी मुक्त विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केले. आता आंतरराष्ट्रीय पातळीवर त्यांच्या कर्तृत्वाची दखल घेतली गेली असून ब्रिटिश कौन्सिल तर्फे दिला जाणारा प्रतिष्ठित सन्मान त्यांना मिळाला आहे. भारतातील 75 विद्यार्थ्यांचा सन्मान भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव व प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून ब्रिटनमध्ये एक कार्यक्रम झाला. यामध्ये गेल्या 75 वर्षांत ब्रिटनमध्ये शिकलेल्या व वेगवेगळ्या क्षेत्रांत आपल्या कार्याचा ठसा उमटवणाऱ्या भारतातील 75 माजी विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला. लंडन येथे 25 जानेवारी रोजी झालेला हा कार्यक्रम ब्रिटिश कौन्सिल, ब्रिटिश सरकारचा उच्च शिक्षण विभाग आणि यूके राष्ट्रीय विद्यार्थी संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला होता. या 75 महत्त्वाच्या व्यक्तींमध्ये बुलढाणा जिल्ह्यातील शेतकरी पुत्र राजू केंद्रे यांचा समावेश आहे.
ब्रिटिश सरकारची शिष्यवृत्ती, लंडनमध्ये शिक्षण राजू यांचे शालेय शिक्षण जिल्हा परिषद शाळेत झाले. पुढे ते उच्च शिक्षणासाठी पुण्यात गेले, पण आर्थिक आणि सामाजिक अडचणीमुळे राजू यांना पुणे सोडावे लागले. या अनुभवातून त्यांनी एकलव्य फाउंडेशन सुरू करावे वाटले. पुणे सोडल्यानंतर यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ नाशिक येथून त्यांनी शिक्षण पूर्ण केले. पुढे टाटा सामाजिक विज्ञान संस्थेतून ग्रामीण विकास विषयात पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. 2021मध्ये त्यांना जगातिल प्रतिष्ठित अशी ब्रिटीश सरकारची मानाची चेव्हेनिंग स्कॉलरशिप मिळाली. त्या माध्यमातून एसओएस, युनिव्हर्सिटी ऑफ लंडन येथून ‘एमएससी एन डेव्हलपमेंट स्टडीज’चे शिक्षण पूर्ण केले. ‘एकलव्य फाउंडेशन’ची कामगिरी राजू केंद्रे यांनी महाराष्ट्रातील गोरगरीब,आदिवासी, दलित गरजू विद्यार्थ्यांच्या उच्च शिक्षणाचा ध्यास घेऊन एकलव्य फाउंडेशनची स्थापना केली. या संघटनेने पहिल्या पिढीत शिक्षण घेणाऱ्या आदिवासी वंचित विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणात मदत केली. ‘एकलव्य’च्या माध्यमातून त्यांनी आतापर्यंत 700 हून अधिक युवकांना उच्च शिक्षणाची संधी मिळवून दिली आहे. सोबतच महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात २० हजारांहून अधिक विद्यार्थ्यांपर्यंत विविध कार्यशाळांच्या माध्यमातून उच्च शिक्षण पोहोचवले आहे.
Inspiring Story : 20 वर्षांपासून रस्त्यावरची झाडं जगवणारा नागपूरकर, अनेकांना दिली प्रेरणा, Videoजगप्रसिद्ध ‘फोर्ब्स’ मासिकाकडून दखल लंडन येथील शिक्षणादरम्यान त्यांनी उच्च शिक्षण आणि असमानता या विषयावर संशोधन केले. त्यांना आंतरराष्ट्रीय पातळीवरील ‘स्वीडीश इन्स्टिट्यूट व जर्मन डेव्हलपमेंट इन्स्टिट्यूट’ येथील फेलो म्हणून निवडले होते. त्यांच्या कार्याची दखल जगप्रसिद्ध ‘फोर्ब्स’ मासिकानेही घेतली. ‘फोर्ब्स इंडिया’च्या सामाजिक क्षेत्रातील उद्यमशीलता या विभागामध्ये भारतातील तिशीच्या आतील 30 ‘प्रभावी तरुण व्यक्तिमत्त्वांच्या’ यादीत त्यांचा समावेश करण्यात आला. 30 हजारांहून अधिक पुस्तकांचे वितरण महाराष्ट्र शासनाच्या ग्रामीण विकास फेलोशिपमध्येही राजू यांनी काम केलेले आहे. त्या काळात पारधी समाजासाठी त्यांनी अनेक विकासकामे केली. महाराष्ट्र सरकारनेही त्यांच्या कामाची देखील घेतली. ज्ञानाच्या विकेंद्रीकरणाच्या दृष्टीने आणि ग्रामीण भागात पुस्तके उपलब्ध करून देण्यासाठी पुणे, ठाणे, औरंगाबाद, यवतमाळ, अमरावती, मुंबई येथून ३० हजारांहून अधिक पुस्तके गोळा केली आणि ती ग्रामीण भागात ग्रंथालय स्वरूपात उभी राहण्यासाठी वितरीत केली. तरुणांनी चाकोरीबद्ध आयुष्य सोडून शिक्षण घ्यावे शिक्षण हेच भांडवल आहे. त्याचा प्रभावी वापर केल्यास जागतिक स्तरावर अनेक पर्याय उपलब्ध आहेत. त्यासाठी तरुणांनी चाकोरीबध्द आयुष्याच्या पलीकडे जाऊन उच्च शिक्षण घेतले पाहिजे. योग्य मार्गदर्शन मिळाल्यास अशा संधी प्राप्त होतील, अशी भावना राजू केंद्रे यांनी व्यक्त केली.

)







