विशाल देवकर, प्रतिनिधी नागपूर, 7 फेब्रुवारी : सध्या सर्वच शहरांमध्ये विकासाच्या दृष्टीने पाऊले पडत असतात. ही विकासकामे होत असताना काही ठिकाणी अनेक वृक्षांचा बळी दिला जातो. तर काही ठिकाणी झाडे लावली जातात. मात्र, त्यातील किती झाडे जगतात हा चिंतनाचा विषय आहे. अशावेळी केवळ एकमेकांची उणीदुणी न काढता एक जबाबदार नागरिक म्हणून नागपुरातील एकाने वृक्षसंवर्धनाचा जगावेगळा आदर्श घालून दिला आहे. दिनेश घोडे हे गेल्या 20 वर्षांपासून आपल्या परिसरात शासनाने लावलेल्या झाडांची काळजी घेत आहेत. त्यांनी संगोपन केलेली परिसरातील अनेक झाडे आज बहरली आहेत. कुठल्याही प्रसिद्धी आणि कौतुकापासून अलिप्त राहून ते हे कार्य नित्यनेमाने करत आहेत. दररोज पाणी देऊन झाडाचे संगोपन नागपुरातील 50 वर्षीय दिनेश घोडे हे एका फर्निचरच्या दुकानात काम करतात. चाकोरीबद्ध आयुष्य जगत असतानाच दैनंदिन जीवनात त्यांनी एक नित्यक्रम मनाशी ठरवला आहे. दत्तात्रय नगर, उदय नगर परिसरात महापालिकेने रस्त्याच्या कडेला आणि दुभाजकावर झाडे लावली आहेत. या झाडांना दररोज पाणी देऊन त्यांचे संगोपन करण्याचे काम ते करत आहेत. वृक्षसंवर्धनासाठी शासन दरबारी अनेक योजना राबविल्या जातात. परंतु, वृक्षारोपन आणि त्यांचे संगोपन ही केवळ सरकारचीच जबाबदारी नाही. त्यामध्ये सामान्य माणसांचा सहभाग वाढला तर वृक्षसंवर्धनाचे काम अधिक प्रभावी होऊ शकते. याचा आदर्शच दिनेश घोडे यांनी घालून दिला आहे.
कशी झाली सुरुवात? आपल्या नित्य उपक्रमाबद्दल सांगताना दिनेश म्हणतात की, 20 वर्षापासून मी प्लायवूडच्या दुकानात काम करीत आहे. या दरम्यानच्या काळात प्रशासनानं रस्त्यावर व कडेला झाडे लावली होती. मात्र, त्यांना पाणी टाकणारी यंत्रणा नियमित येत नसल्याने झाडे वाळून मृत अवस्थेत पोहचली होती. मला ते बघून योग्य वाटत नव्हतं. त्या दिवसापासून मी या झाडांना नित्यनेमाने पाणी टाकायला सुरुवात केली. बघता बघता ही झाडे बहरली आणि मला अतिशय आनंद झाला.
Solapur : सोलापूरकर घेणार मोकळा श्वास, शहरातील धूळ रोखण्यासाठी पालिकेनं शोधला उपाय, Video
ही बाब मला अतिशय समधानकारक वाटत असून या कार्यातून मला मनस्वी आनंद होतो. आज मी संगोपन केलेली असंख्य झाडे मोठी झाली आहे. आज त्यांच्या सावलीत मला प्रेम जाणवते. मी आपल्या पोरा-पोरीं प्रमाणे त्यांची काळजी घेतली. मी करत असलेलं काम हे मोठे असं काही नाही तर प्रत्येक नागरिकांचे एक कर्तव्य आहे. मी माझे कर्तव्ये करत आहे आणि यातून मला समाधान मिळते, असं दिनेश सांगतात.