नागपूर, 29 डिसेंबर : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संघ मुख्यालयाला भेट दिली. नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशन सुरू असल्यामुळे एकनाथ शिंदे रेशीमबागेत गेले होते. मुख्यमंत्र्यांच्या या भेटीवरून उद्धव ठाकरे यांनी सरसंघचालक मोहन भागवत यांना सल्ला देत शिंदेंवर निशाणा साधला आहे.
'भागवत साहेब कोपरे-कोपरे तपासून बघा, कुठे लिंबं-टाचण्या पडल्यात का ते बघून घ्या. काल आमचं कार्यालय ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला, आज आरएसएसच्या मुख्यालयावर कब्जा मिळवण्याचा प्रयत्न केला असेल. यांची नजर फार वाईट आहे, याचा अनुभव आम्ही घेतला. जे चांगलं आहे ते आपण नाही करू शकत, मग त्या चांगल्यावर कब्जा कसा मिळवायचा, ही त्यांची वृत्ती आहे. ही वृत्ती घातक आहे, त्यामुळे आरएसएसनेही काळजी घ्यायची गरज आहे,' अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली आहे.
'शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत, महिलांचे प्रश्न आहेत, यावर कुणी बोलत नाही. शेतकरी आत्महत्या वाढत आहेत, यावर चर्चा होत नाही, अशी खंत उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली.
'स्वत: मध्ये काही मिळवण्याची धमक नाही, दुसऱ्यांचं चोरायचं. महाराष्ट्रात टोळीचं राज्य आलं आहे, अशी भावना जनतेमध्ये व्हायला लागली आहे. काल आमच्या कार्यालयावर ताबा मिळवला, आज आरएसएस मुख्यालयात गेले होते, तिकडे ताबा मिळवू शकले नाहीत. आरएसएस मजबूत आहे, पण आरएसएसने सावध राहण्याची गरज आहे,' असं उद्धव ठाकरे म्हणाले.
शिंदे गटाने कालच मुंबई महापालिकेतलं शिवसेनेचं कार्यालय ताब्यात घेतलं. मुंबई महापालिकेच्या शिवसेना पक्ष कार्यालयावर बाळासाहेबांची शिवसेना पक्षाने ताबा मिळवला. राहुल शेवाळे, शितल म्हात्रे, नरेश म्हस्के यांनी पालिका आयुक्त इक्बाल सिंग चहल यांची भेट घेतली. या भेटीनंतर शिवसेना पक्षकार्यालयाबाहेर यशवंत जाधव यांच्या नावावर लावलेला कागद पटवत पक्ष कार्यालयावर ताबा मिळवण्यात आला. यावरूनच उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंवर निशाणा साधला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.