रवि गुलकरी, प्रतिनिधी वाशिम, 3 ऑक्टोबर : सध्या नवरात्री सुरू आहे. त्यामुळे या नवरात्रोत्सवात गरबा खेळत अनेक जण हा उत्सव साजरा करतात. मात्र, याच उत्सवादरम्यान, दोन धक्कादायक घटना समोर आल्या आहेत. नवरात्रीच्या निमित्ताने गरबा खेळताना एकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे. तर दुसऱ्या घटनेत गरबा खेळून झाल्यावर घरी जाताना दुसऱ्या व्यक्तीचाही हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे. काय आहे संपूर्ण प्रकरण - गोपाल इन्नानी आणि सुशिल काळे अशी या दोन मृतांची नावे आहेत. सध्या नवरात्रीचा उत्सव सगळीकडे जोरात सुरू आहे. मात्र, यातच दोन धक्कादायक घटना समोर आल्या आहेत. पहिली घटना ही वाशिम जिल्ह्यातील कारंजा लाड येथील आहे. येथील गोपाल इन्नानी 30 सप्टेंबरला रात्री महेश भवन येथे गरबा खेळत होते. मात्र, याचदरम्यान, गरबा खेळताना ते अचानक पडले आणि क्षणार्धात त्यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. त्यांना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. यासारखीच आणखी एक दुर्घटना कारंजा लाड शहराच्या शांतीनगर येथील सुशील काळेसोबत घडली. सुशील काळे हा तरुण 1 ऑक्टोबरच्या रात्री गरबा नृत्यात सहभागी झाला होता. यानंतर गरबा खेळून ते घरी पोहोचले. सकाळी झोपेतून उठल्यावर त्यांना अस्वस्थ वाटायला लागले. मात्र, डॉक्टरजवळ जाण्याआधीच त्यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. या दोन्ही घटनां कारंजा लाड येथे घडल्या. या दोन्ही घटनेमुळे परिसर सुन्न झाला आहे. हेही वाचा - प्रसिद्ध उद्योगपती एटलास रामचंद्रन यांचं दुबईमध्ये निधन
मुलूंडमध्येही धक्कादायक घटना -
गरबा खेळताना शनिवारी रात्री हृदयविकाराचा झटका येऊन तरुणाचा मृत्यू झाला. मुलुंडमधील कालिदास नाट्यगृह इथे भाजपतर्फे आयोजित प्रेरणा रासमध्ये ही घटना घडली. ऋषभ लहरी मंगे भानुशाली असं मृत 27 वर्षीय तरुणाचं नाव आहे. तो डोंबिवलीचा रहिवासी होता. ऋषभ लहरी मंगे भानुशाली याने एमबीएचे शिक्षण घेतले होते. बोरिवलीतील एका खासगी कंपनीत ऋषभ कामाला होता.