विशाल देवकर, प्रतिनिधी
नागपूर, 25 मार्च: रामजन्मभूमी अयोध्येत भव्य राम मंदिर उभारणीचे काम सुरू आहे. 'रामलला' मंदिरात विराजमान होण्याची रामभक्त मोठ्या आतुरतेनं वाट पाहत आहेत. या भव्य मंदिराच्या निर्मितीसाठी राजस्थानातील खास दगडांचा वापर करण्यात आला आहे. आता अयोध्येतील राम मंदिराच्या उभारणीत महाराष्ट्राचे देखील योगदान असणार आहे. मंदिरासाठी लागणारे 1800 क्यूबिक मीटर लाकूड महाराष्ट्रातून जाणार आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील दर्जेदार सागवान मंदिराच्या निर्मितीसाठी वापरण्यात येणार आहे. 29 मार्चला भव्य शोभायात्रेसह लाकडाची पहिली खेप अयोध्येला जाणार आहे.
राम मंदिराच्या भव्यतेसोबत मजबुतीकडे लक्ष
अयोध्येतील भव्य राम मंदिराच्या निर्मितीसाठी दर्जेदार साहित्याचा वापर केला जात आहे. मंदिराच्या भव्यतेसोबतच त्यावरील कलाकुसर आणि मजबुती याकडेही मंदिर निर्माण ट्रस्ट विशेष लक्ष देत आहे. त्यासाठी खास राजस्थानातून खास दगड मागवला आहे. तर महाराष्ट्रातील चंद्रपूर जिल्ह्यातून सागवानी लाकूड नेण्यात येणार आहे. मंदिराचा मुख्य दरवाजा आणि इतर कोरीव लाकडी बांधकामासाठी लाकडाची आश्यकता आहे. त्यासाठी 1800 क्यूबिक मीटर लाकूड अयोध्येला पाठवले जाणार आहे.
चंद्रपूर आणि गडचिरोलीत सर्वोत्तम सागवान
राम मंदिराचे मुख्य प्रवेशद्वार आणि इतर बांधकामासाठी सर्वत्तोम लाकडाचा वापर व्हावा, असा सर्वांचाच आग्रह आहे. या संबंधित माहिती समितीचे अध्यक्ष नृपेंद्र मिश्रा यांनी घेतली. महाराष्ट्रातील चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात आढळणारे गोलाकार लाकूड आणि चिरण सागवान हेच भारतातील सर्वोत्तम दर्जाचे लाकूड असल्याचे मत, उत्तराखंड येथील डेहराडून वन संशोधन संस्थेच्या अभियंत्यांनी व्यक्त केले. राम मंदिराच्या निर्मिती करणारी लार्सन टुब्रो, टीसीई आणि ट्रस्टच्या वतीने बल्लारशाह डेपो मध्ये ठेवलेल्या लाकडाची पाहाणी केली. निरीक्षणाअंती राम मंदिराच्या बांधकामासाठी चंद्रपुरातील लाकडाचा वापर व्हावा, यावर शिक्कमोर्तब झाला आहे.
प्रभु श्रीरामांनाही होती मोठी बहीण, भारताच्या या राज्यात आहे त्यांचे मंदिर
बल्लारपूर येथील लाकूड आगार आशिया खंडात प्रसिद्ध
राम मंदिराचे बांधकाम करताना त्याच्या मजबुतीसाठी राम मंदिर निर्माण ट्रस्ट आग्रही आहे. विदर्भातील चंद्रपूर आणि गडचिरोली या भागात मोठ्या प्रमाणावर सागवानाचे जंगल आहे. सागवान हे सर्वोत्तम लाकडांपैकी एक मानले जाते. शिवाय ते प्रदीर्घ काळ टिकते. बल्लारपूर आगारातील सागवान आंतरराष्ट्रीय टिक हार्वेस्टिंगसाठी प्रसिद्ध आहे. तर वन विकास महामंडळाचे बल्लारपूर येथील लाकूड आगार आशिया खंडात प्रसिद्ध आहे.
संसद भवनाच्या निर्मितीसाठीही वापरले चंद्रपूरचे लाकूड
यापूर्वी देखील भारताच्या नव्या संसद भवन बांधकामासाठी बल्लारपूर आगारातून लाकूड खरेदी करण्यात आले होते. ग्लोरी ऑफ फॉरेस्ट म्हणून प्रसिद्ध असलेल्या विदर्भातील जंगलातील हे उच्च दर्जाचे सागवान आहे. संसद भवनाचे सौंदर्य खुलविण्यात अत्यंत सुबक व देखण्या लाकडाने मोलाची भर घातली आहे. आता पुन्हा एकदा अयोध्येतील राम मंदिराच्या निर्मितीत बल्लारपूर आगारातील सागवान वापरण्यात येणार असल्याने मंदिराच्या बांधकामात महाराष्ट्राचे देखील योगदान असणार आहे.
महिला भाविकाची अशीही 'श्रीराम' भक्ती! तांदळाच्या साडेसात लाख दाण्यांवर लिहलं नाव
29 मार्चला पहिली खेप जाणार
अयोध्येतील श्री रामजन्मभूमी मंदिराचे दरवाजे बांधण्यासाठी महाराष्ट्र वनविकास महामंडळाकडून चंद्रपूर जिल्ह्यातील सागवान लाकूड उपलब्ध करून देण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. ही लाकडे मंगळवारी 28 मार्चला बल्लारपूर येथील वनविकास महामंडळ (एफडीसीएम) च्या डेपोत पोहोचणार आहेत. 1800 क्यूबिक मीटर लाकडापैकी पहिली खेप 29 मार्चला जाणार आहे. भव्य शोभा यात्रेसह विविध ठिकाणी विधिवत पूजा करून ही खेप पाठवण्यात येणार आहे, अशी माहिती महाराष्ट्राचे सांस्कृतिक व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली आहे.
समर्थ रामदास स्वामींनी स्थापन केलेले 11 मारुती माहिती आहेत का? घरबसल्या घ्या सर्वांचं दर्शन, Photos
अयोध्येला लाकूड पाठवण्याचा कार्यक्रम
29 मार्च रोजी श्रीराम मंदिराच्या उभारणीसाठी लागणाऱ्या सागवान लाकडाची पहिली खेप अयोध्या कडे रवाना होणार आहे. त्यानिमित्ताने बल्लारपूरच्या एफडीसीएमच्या डेपोतून माता महाकाली मंदिर, चंद्रपूर शहर मार्गे या सागवान लाकडाची भव्य शोभा यात्रा काढण्यात येणार आहे. तसेच ठीक ठिकाणी काष्टपूजन होणार आहे. दुपारी 3.30 वाजता फॉरेस्ट एन्ट्री गेट, अलापल्ली रोड, बल्लारपूर येथून काष्ठ शोभायात्रेस सुरवात होणार असून सायंकाळी 6 वाजता सर्वधर्मीय भव्य काष्ठपूजन सोहळा माता महाकाली मंदिर, चंद्रपूर येथे होणार आहे. तर रात्री 9 वाजता संगीतकार कैलास खेर यांचा रामगीतांचा कार्यक्रम चांदा क्लब ग्राऊंड, चंद्रपूर येथे संपन्न होणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Ayodhya Ram Mandir, Chandrapur, Local18, Nagpur, Ram Mandir