भद्राचलम, 23 मार्च : सध्याच्या पिढीतील तरुणांमध्ये आध्यात्मिक जागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने तेलंगणातल्या एका महिला भाविकाने तांदळाच्या साडेसात लाखांहून अधिक दाण्यांवर श्रीरामाचं नाव लिहिलं असून, नाव लिहिलेले 1,01,116 दाणे भद्राद्री इथल्या श्री सीता रामचंद्र स्वामी मंदिराच्या अधिकाऱ्यांकडे सुपूर्द केले आहेत. 30 मार्च रोजी होणार असलेल्या भगवान श्रीराम आणि सीता मातेच्या विवाहासाठी अक्षता म्हणून या पवित्र तांदळांचा वापर केला जाणार आहे. या महिलेच्या खास उपक्रमाची सर्वत्र जोरदार चर्चा होत आहे. तरुणांमध्ये अध्यात्माविषयी जागृती व्हावी, यासाठी महिलेचे सुरू असलेले प्रयत्न कौतुकास्पद ठरले आहेत.
प्रभू श्रीरामाची भक्त असलेली मल्ली विष्णू वंदना ही महिला तेलंगणातली हैदराबादची रहिवासी आहे. तिने तांदळाच्या तब्बल साडेसात लाख दाण्यांवर श्रीरामाचं नाव लिहिलं आहे. यातले 1,01,116 तांदळाचे दाणे तिने श्रीरामाच्या नावाने भद्राद्री श्री सीता रामचंद्र स्वामी मंदिराच्या अधिकाऱ्यांकडे सुपुर्द केले आहेत. 30 तारखेला होणाऱ्या विशेष धार्मिक कार्यक्रमात या तांदळाच्या दाण्यांचा वापर केला जाईल.
मल्ली विष्णू वंदना या महिलेनं `न्यूज 18` शी बोलताना सांगितलं, की `सध्याच्या आधुनिक जगात तरुणांमध्ये आध्यात्मिक भावना रुजवण्यासाठी मी 2016मध्ये तांदळाच्या दाण्यांवर श्रीरामाचं नाव लिहिण्यास सुरुवात केली. मी आतापर्यंत तांदळाच्या 7,52,864 दाण्यांवर श्रीरामाचं नाव लिहिलं आहे. मी लहानपणीच अध्यात्माचा मार्ग निवडला आहे. याच मार्गावर माझी अजूनही वाटचाल सुरू आहे.`
वाचा - अक्कलकोट स्वामी प्रकट दिन; अशी आहे श्री स्वामी समर्थांच्या प्रकट दिनाची कथा
आंध्र प्रदेशातल्या अल्लागड्डा, विजयानगरम इथलं श्री सीता रामचंद्र स्वामी मंदिर, तेलंगणातल्या करीमनगर जिल्ह्यातल्या इल्लान्थुकुंता, नेरेदुचार्ला, हैदराबाद इथल्या मंदिरांच्या अधिकाऱ्यांना ही महिला प्रभू श्रीरामाचं नाव लिहिलेले अन्य तांदळाचे दाणे सुपूर्द करणार आहे. 30 मार्च रोजी होणाऱ्या भगवान श्रीराम आणि सीता मातेच्या स्वर्गीय विवाहादरम्यान अक्षिंतलू (अक्षता) म्हणून हे तांदूळ वापरले जाणार आहेत.
सध्याच्या तरुण पिढीने अध्यात्माकडे वळावं, त्यांच्या मनात अध्यात्माची ओढ निर्माण व्हावी, या उद्देशाने मल्ली विष्णू वंदना या महिलेनं राबवलेला हा उपक्रम कौतुकास्पद असल्याची चर्चा होत आहे. तांदळाच्या दाण्यांवर श्रीरामाचे नाव लिहून तिने एक वेगळा प्रयत्न केला आहे. तिच्या या कामाचं सर्वत्र कौतुक होत आहे. श्रीराम नवमीच्या निमित्ताने होणाऱ्या सोहळ्यावेळी या तांदळाच्या दाण्यांचा वापर संबंधित मंदिर व्यवस्थापनाकडून केला जाणार आहे. अत्यंत अवघड काम करणाऱ्या मल्ली विष्णू वंदना यांचं सर्वत्र कौतुक होत असून त्यांच्या या कलेची जोरदार चर्चा सुरू आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Ram