विशाल देवकर, प्रतिनिधी नागपूर, 27 एप्रिल : नागपूर जवळील पेंच व्याघ्र प्रकल्पाच्या वतीने मगर आणि कासव यांच्या अधिवासांचा शोध घेण्यासह त्यांचे निरीक्षण केले जावे या उद्देशाने सर्वेक्षण केले जाणार आहे. अश्या प्रकारचे हे मध्य भारतातील पहिलेच सर्वेक्षण असणार आहे. विशेष म्हणजे या सर्वेक्षणात सर्व सामान्यांना देखील मोफत सहभागी होता येणार आहे. मध्य भारतातील पहिलेच सर्वेक्षण महाराष्ट्रातील पेंच व्याघ्र प्रकल्पातील पेंच नदीपात्रात 2 जून रोजी कोलितमारा पर्यटन परिसरापासून या सर्वेक्षणाला प्रारंभ होईल आणि 4 जूनपर्यंत हे सर्वेक्षण चालणार आहे. मगरी आणि कासव यांचा अधिवास पेंच येथील नदीपात्रात आढळून आला आहे. या सर्वेक्षणात मगर आणि कासव या दोन्ही प्राण्यांची नदीतील घनता आणि त्यांच्या अधिवासाच्या वापराचा अभ्यास केला जाणार आहे. स्वयंसेवक,संशोधक आणि नागरिकांच्या सहभागाने होणारे हे अशा प्रकारचे मध्य भारतातील पहिलेच सर्वेक्षण आहे.
सहभागी होण्याची संधी पेंच नदी, लोअर पेंच धरण आणि तोतलाडोह जलाशयाच्या उतारांचे सर्वेक्षण यात करण्यात येणार आहे. तीनसा इकॉलॉजिकल फाऊंडेशनच्या सहकार्याने हा प्रकल्प राबविला जाणार आहे. या सर्वेक्षणात मगरींसंदर्भात काम करणारे 30 पेक्षा अधिक तज्ज्ञ आणि संशोधक सहभागी होणार आहे. अशाप्रकारच्या कामाचा पूर्वीचा अनुभव असलेले स्वयंसेवक या सर्वेक्षणात भाग घेऊ शकतात. एकाच वेळी अभ्यास या उपक्रमामुळे व्यवस्थापनाला संपूर्ण व्याघ्रप्रकल्पाचा एकाच वेळी अभ्यास करता येणार आहे. संशोधक, बचावकर्ते आणि स्वयंसेवकांच्या मदतीने मगरी आणि कासवांच्या अधिवासाच्या वापराचे वैज्ञानिक दस्तावेजीकरण केले जाणार आहे. त्यातून व्याघ्रप्रकल्पातील पेंच नदीच्या अधिवासातील विविध भागांत मगरी आणि विविध कासवांच्या प्रजातींची विपुलता आणि वितरणाचा अंदाज येणार आहे. Good News : वाघांना ‘पेंच’ आवडतंय! व्याघ्र प्रकल्पानं उंचावली महाराष्ट्राची मान, Video 15 मे पर्यंत करत येणार नोंदणी या सर्वेक्षणात सहभागी होण्यास इच्छुक असलेल्यांनी 15 मे रोजी सायंकाळी पाच वाजतापर्यंत https://forms.gle/CgVSVf2YZugyNBZ27 या लिंकद्वारे गुगल अर्ज भरावयाचे आहेत. सहभागींकडून कोणतेही शुल्क आकारण्यात येणार नाही. निवडलेल्या सहभागींना मेलद्वारे कळवले जाईल. सहभागींना निवडलेल्या सर्वेक्षण क्षेत्राजवळ निवडलेल्या संरक्षण कुटींपैकी एकाचे वाटप केले जाईल. प्रत्येक संरक्षण कुटीवर किमान एका तज्ज्ञाच्या एक वा दोन व्यक्ती राहतील. त्यांच्या राहण्याची आणि जेवणाची सोय पेंच व्याघ्रप्रकल्प प्रशासनाकडून केली जाईल. सर्वेक्षणामध्ये किनाऱ्याच्या बाजूने पायी चालून आणि नावेद्वारे नदीत प्रवास करून नोंदी घेणे अपेक्षित राहणार आहे. या संदर्भातील माहितीसाठी www.penchtigerreserve. maharashtra.gov.in या संकेतस्थळावर संपर्क साधावा, असे आवाहन पेंच व्याघ्र प्रकल्प प्रशासनाने केले आहे.