विशाल देवकर, प्रतिनिधी नागपूर, 22 एप्रिल: देशभरातील व्याघ्र प्रकल्पांच्या व्यवस्थापनातील कामगिरीचा अहवाल नुकताच केंद्र सरकारने जाहीर केला. यामध्ये देशातील वाघांची संख्या वाढल्याचे पुढे आले असून ही संख्या 3 हजार 167 वर पोहचली आहे. तर देशातील 50 हून अधिक व्याघ्र प्रकल्पांपैकी टायगर कॅपिटल ऑफ इंडिया अशी ख्याती असलेल्या नागपूर जवळील पेंच व्याघ्र प्रकल्पाला 8 वे स्थान मिळाले आहे. तसेच सर्वोत्तम मूल्यांकन प्राप्त करून पेंच व्याघ्र प्रकल्पाने राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. पेंच व्याघ्र प्रकल्प देशात आठवा 2022 च्या सर्वेक्षणानुसार भारतात असलेल्या 50 हून अधिक व्याघ्र प्रकल्पांपैकी नागपूरमधील पेंच व्याघ्र प्रकल्पाने 90.91 टक्के गुण प्राप्त करून आठवा क्रमांक पटकावला आहे. महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश या दोन्ही राज्यात असलेला पेंच व्याघ्र प्रकल्प 292.85 चौरस किलोमिटर एवढ्या परिसरात पसरलेला आहे. तसेच, दोन राज्यांमधून जाणारा हा भारतातील पहिलाच व्याघ्र प्रकल्प आहे. केरळमधील पेरियार व्याघ्रप्रकल्पाने 94.38 टक्क्यांसह देशात प्रथम स्थान मिळविले आहे. त्यानंतर मध्य प्रदेशातील सातपुडा आणि बंदीपूरचा क्रमांक लागतो.
महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा पेंच व्याघ्र प्रकल्पाने देशात आठवा तर महाराष्ट्रात पहिला क्रमांक पटकावला आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. शिवाय रुडयार्ड किपलिंग यांनी लिहिलेल्या ‘द जंगल बुक’ मधील मोगली या पात्रामुळे पेंच जंगल जागतिक पातळीवर नावारूपास आले. आता या मानंकनाने त्यात अधिक भर पडली आहे. दरम्यान, व्याघ्र प्रकल्पांच्या सर्वेक्षणात देशातील 12 व्याघ्र प्रकल्पांना सर्वोत्कृष्ट प्रवर्गात स्थान मिळाले आहे. त्यामध्ये महाराष्ट्रातील पेंच व्याघ्र प्रकल्पासह उत्कृष्ट प्रवर्गामध्ये ताडोबा-अंधारी, मेळघाट, नवेगाव-नागझिरा, सह्याद्री आणि बोर या प्रकल्पांचा समावेश आहे. त्यामुळे एकूण 33 निकषांच्या आधारे मूल्यमापन भारतात एकूण 53 व्याघ्र प्रकल्पांचा समावेश आहे. 2022 च्या ऑगस्ट महिन्यात व्याघ्र गणनेच्या प्रक्रियेस प्रारंभ झाला होता. यामध्ये जंगलांच्या मूल्यमापनासाठी 33 निकष ठरविण्यात आले होते. यामध्ये, व्याघ्र प्रकल्पातील कामांचे दस्तावेजीकरण, जंगलातील मानवी हस्तक्षेप, व्याघ्रसंवर्धन आराखडा, लोकसहभाग, अधिवास व्यवस्थापन, मानव-वन्यजीव संघर्षाचे व्यवस्थापन, संसाधनांची उपलब्धता, आर्थिक संसाधने, कर्मचाऱ्यांच्या प्रशिक्षणाची व्यवस्था, जंगला भोवतालच्या लोकांच्या उत्पन्नाची साधने, जंगलातील गावांचे स्थानांतरण, कोअर भागातील पर्यटनावर आळा घालणे, आर्थिक व्यवस्थापन, वन्यप्राणांच्या संख्येवर झालेला परिणाम, व्याघ्रसंख्येतील बदल, पर्यटकांचे समाधान अशा विविध मुद्द्यांचा या निकषांत समावेश होता. Pench Tiger Project: नागपूर जवळचं वाघाचं घर, ‘जंगल बुक’शी आहे खास कनेक्शन! Video सर्वांच्या कष्ट आणि सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे यश पेंच व्याघ्र प्रकल्पामध्ये गेल्या काही वर्षांमध्ये सातत्याने चांगले काम होत आहे. यापूर्वीच्या व्याघ्र प्रकल्प प्रमुखांसह सर्व स्थरातील अधिकारी, पदाधिकारी, कर्मचारी वर्ग, अशासकिय संस्था, सामाजिक संस्था आंदींनी आपले योगदान दिले आहे. नियोजनबध्द आणि सातत्यपूर्ण केलेल्या चांगल्या कामाच्या आधारे आम्ही पुढे वाटचाल सुरू ठेवली आहे. केवळ जंगलच किंवा वाघ यांच्यापुरते मर्यादित न राहता संपूर्ण अधिवास, स्थानिकांचा सहभाग, अशा सर्वार्थाने परिपूर्ण उपाययोजनांवर आम्ही प्रामाणिक पणे काम केले. त्यामुळे देशात आठवा क्रमांक मिळाला असून राज्यात प्रथम क्रमांकाचे स्थान मिळाले आहे, असे पेंच व्याघ्रप्रकल्पाच्या क्षेत्र संचालक श्रीलक्ष्मी ए. भवासे यांनी सांगितले. सर्वांच्या कष्टाचं फलित सध्या पेंच व्याघ्र प्रकल्पाने राष्ट्रीय पातळीवर यश मिळवले आहे, या पुढे हे सातत्याने टिकवून ठेवणे आणि अधिक प्रगती करणे हे एक आव्हान आहे. आगामी काळात यापेक्षाही वरचे स्थान मिळेल असे प्रयत्न नक्कीच राहणार आहेत. हे यश एका कुणाचे किंवा एक दोन वर्षातील कामाचे नाही तर यासाठी प्रदीर्घ काळापासून राबणाऱ्या सर्व अधिकारी आणि कर्मचारी यांच्या कष्टाचं हे फलित आहे, अशी माहिती पेंच व्याघ्रप्रकल्पाच्या क्षेत्र संचालक भवासे यांनी दिली.