विशाल देवकर, प्रतिनिधी नागपूर, 31 मे: जिद्द मेहनत आणि दुर्दम्य इच्छाशक्ती असेल तर कुठलीही गोष्ट अशक्य नाही. प्रतिकूल परिस्थितीत जे संघर्ष करत राहतात विजयश्री अश्यांच्याच गळ्यात यशाची माळ घालत असते. अशीच संगर्षमय गोष्ट नागपूर जिल्हातील नरखेडच्या प्रतीक कोरडे याची आहे. नुकताच युपीएससी परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून यामध्ये प्रतिकने देशात 638 वी रँक मिळवली आहे. प्रतीकच्या या यशाचे सर्वच स्तरातून कौतुक होत असताना प्रतीक मात्र त्याच्या यशाचे श्रेय आई वडिलांना देतो. वडिलांप्रमाणे मला देखील देशसेवा करून जन्मदात्या आईसह मातृभूमीचे ऋण फेडायचं आहे, असं प्रतिक सांगतो. खेड्यातून सुरू झालं शिक्षण नागपूर जिल्ह्यातील भिष्णूर या लहानशा खेड्यात प्रतिकचा जन्म झाला. वडील भारतीय सैन्यात देशसेवा करत होते. तर आई कुटुंब सांभाळत होत्या. त्यांनीच तिन्ही मुलांना चांगले संस्कार देऊन घडवलं. प्रतिकचं प्राथमिक शिक्षण भिष्णूर येथेच जिल्हा परिषदेच्या शाळेतच झालं. माध्यमिक शिक्षण तालुक्याचे ठिकाण नरखेड येथे तर उच्च माध्यमिक शिक्षण नागपुरातील पटवर्धन हायस्कूलमध्ये घेतले. बारावीत चांगले गुण मिळवणाऱ्या प्रतिकचं वडिलांप्रमाणेच सैन्यात जायचं स्वप्न होतं. पुढं त्यानं सर परशुराम भाऊ कॉलेज येथे मास्टर्स ऑफ आर्ट इन इंग्लिश लिटरेचर केल्यानंतर युपीएससीचा मार्ग निवडला.
अखेर युपीएससी परीक्षेत यश मिळालं युपीएससी परीक्षेचा अभ्यास सुरू केला. तेव्हा कोरोना काळात परीक्षा देता आली नाही. मात्र, या काळात अभ्यास सुरूच ठेवला. 2022 च्या युपीएससी परीक्षेत प्रतिकनं यशाला गवसणी घातली. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत देशात 638 वी रँक मिळाली. त्यामुळे प्रतिकवर सर्वत्र कौतुकाचा वर्षाव होत आहे. यशाचं श्रेय आई-वडिलांना माझ्या या यशामुळे आई-वडिलांना जो अभिमान झाला आहे त्याची तुलना कशाशीच होऊ शकत नाही. माझ्या या यशाचे सर्वस्वी श्रेय हे माझ्या आई-वडिलांचे आणि आप्त स्वकियांचे आहे. वडील देशसेवेसाठी बॉर्डरवर असताना माझ्या आईने आम्हा तीनही मुलांचा सांभाळ केला. 2001 मध्ये वडील सैन्य सेवेच्या पदावरून निवृत्त झाल्यावर त्यांनी काही काळ शेती केली तर 2012 मध्ये आमच्यासाठी सिक्युरिटी डिपार्टमेंट मध्ये देखील काम केले, असे प्रतिकने सांगितले. 50 लाखांचे पॅकेज असलेल्या सॅाफ्टवेअर इंजिनिअरने दिली UPSC ची परीक्षा, अखेर निकाल आला Video तिन्ही भावंडांनी मिळवलं यश आई-वडिलांच्या चांगल्या संस्कारामुळे आणि त्यांच्या कष्टाचे चीज व्हावे यासाठी आम्ही तिघं भावंड एका मोठ्या स्वप्नाच्या पाठी होतो. त्यात पाहिले यश माझी बहीण पुनम कोरडे हिने राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत मिळवलं. सध्या ती पोलीस उपनिरीक्षक म्हणून कार्यरत आहे. त्यानंतर मधली बहीण प्रियंका ही वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत आहे. आता मला मिळालेले हे यश माझ्या कुटुंबीयांसाठी त्यांच्या कष्टांचे सार्थक करणारे ठरले आहे, अशी भावना प्रतीक कोरडे यांनी व्यक्त केली.