नारायण काळे, प्रतिनिधी जालना, 29 मे : केंद्रीय लोकसेवा आयोगाने नुकताच नागरी सेवा परीक्षेचा निकाल जाहीर केला. ही परीक्षा पास होऊन सरकारी अधिकारी होण्याचं लाखो तरुणांचं स्वप्न असतं. याचं परीक्षेत जालन्याच्या अभिजय पगारे याने देशात 844 वा क्रमांक मिळविला आहे. पहिल्या प्रयत्नात मुलखात दिल्यानंतर त्याच्या पदरी अपयश आलं होत. मात्र या अपयशाने खचून न जाता त्याने तयारी सुरूच ठेवली. नुकत्याच लागलेल्या निकालात मिळालेल्या यशाने त्याच्यासह त्याचे कुटुंबीय अतिशय आनंदी आहे. कसा झाला प्रवास? जालना शहरातील जेईएस महाविद्यालयातील उपप्राचार्य विजय पगारे यांचा मुलगा अभिजय पगारे याचे 12 वी पर्यंतचे शिक्षण जालना शहरातील शाळा, महाविद्यालयांमध्ये झाले. त्यानंतर एनआयटी वारंगल येथे त्याने कॉम्प्युटर सायन्समध्ये पदवी मिळविली. पदवी मिळाल्यानंतर अभिजय पगारे याने बंगळूरू येथील एका कंपनीत सॉफ्टवेअर अभियंता म्हणून नोकरी स्वीकारली. वार्षिक 50 लाख रूपयांचे पॅकेज असतानाही अभिजय पगारे याने आयएएस होण्याचे स्वप्न पाहत चार वर्षापासून दैनंदिन 8 तासाची नोकरी करून यूपीएससीची तयारी केली. पहिल्या प्रयत्नात त्याला अपयश आले होते. परंतु, दुसऱ्या प्रयत्नात त्याने यश मिळविले, असं अभिजयचे वडिल विजय पगारे यांनी सांगितले.
अभिजय पगारे पहिल्या प्रयत्नात तो मुलाखतीपर्यंत पोहोचला होता. परंतु, त्याला त्यावेळी अपयश आले. परंतु, हार न मानता आयएएस व्हायचे या हेतूने त्याने अभ्यासातील सातत्य कायम ठेवले. यूपीएससीची परीक्षा दिली आणि नुकत्याच लागलेल्या यूपीएससीच्या निकालात त्याने 844 वा क्रमांक मिळवला आहे. प्राप्त क्रमांकानुसार इंडियन फॉरेन सर्व्हिस किंवा इंडियन रेव्ह्यून्यू सर्व्हिसमध्ये नोकरीची संधी मिळणार आहे. अभिजय पगारे याच्या या यशाबद्दल जालना शहरासह जिल्हाभरातून त्याचे कौतुक केले जात आहे.
UPSC Success Story : भाजी विकून वडिलांनी शिकवलं, आज लेकाने UPSC पास करून दाखवलं
यश मिळाल्याचे समाधान सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून चांगली नोकरी आहे. परंतु, शासकीय नोकरीतून समाजाची सेवा करण्याची आवड आहे. त्यामुळे मी प्रारंभीपासूनच आयएएस होण्याचे स्वप्न पाहत यूपीएससीची तयारी केली. आज यश मिळाल्याचे समाधान आहे. शिवाय आयएएस होण्यासाठी आपले प्रयत्न कायम राहणार आहेत, असं अभिजय पगारे याने सांगितले.