नरेंद्र मते, प्रतिनिधी
वर्धा, 25 जानेवारी : समाजाच्या सांस्कृतिक, आर्थिक, पारंपरिक मर्यादेत अनेक घटकांना शिक्षणापासून वंचित राहावं लागतं. या वंचितांमधील एक प्रचंड दुर्लक्षित घटक म्हणजे तृतीयपंथी. त्यांना विविध गोष्टीचा सामना करावा लागतो, त्यांना समाजात हिणवले जाते. त्यामुळेचं त्यांना शिक्षणापासून वंचित राहावं लागतं. पण याला अपवाद ठरली ती म्हणजे वर्धाच्या रामनगर इथली शिवानी सुरकार.
शिवानी उर्फ विजय हिचा जन्म हा विजया दशमीला झाल्याने तिचे नाव विजय असे ठेवले. शिवानीने सांगितले की, माझा जन्म जरी मुलाच्या योनीतून झाला असला तरी मला मुलीप्रमाणे राहायला आवडायचं. ज्याप्रमाणे मुली तयार होतात तसे मला तयार व्हायला आवडायचं. लिपस्टिक लावणे, वेण्या घालणे, मुलींचे कपडे घालणे इत्यादी गोष्टी मला आवडायच्या. जसे जसे माझे वय वाढत गेले तसे तसे वयाच्या 18 ते 20 व्या वर्षी विजय उर्फ शिवानी हिला कळले की, ती एक तृतीपंथी आहे. त्यानंतर ती रेल्वेत, पेट्रोल पंप, टोल नाक्यावर तीने पैसे सुद्धा मागितले. आणि आजही काम पडले की ती पैसे मागते. तो एक हक्क आहे. लोक भीक म्हणून देतात पण आम्ही शगुन म्हणून मागतो, असे ती म्हणते.
ती तृतीयपंथी आहे, असे कळल्यानंतर तिला सर्वात जास्त धीर आणि आधार तिचे वडील संतोषराव सुरकार यांनी दिला. शिवानीने बोलतांना सांगितले की, माझ्या वडिलांनी मला शिक्षणा शिवायपर्याय नाही. तुला समाजात जगायचे असेल तर तुला खूप खुप शिकावं लागेल. त्यांचं ऐकून शिवानीने स्वतःला शिक्षणाच्या प्रवाहात झोकून घेतलं व वर्धेतूनच तिने बीकॉमचे शिक्षण पूर्ण केले. नंतर सेवाग्राम इथून एमबीए केले. तसेच दिल्ली विद्यापीठाचा एनडीडी हा नॅचरोपॅथीचा अभ्यासक्रमही तिने पूर्ण केला आहे. त्यानंतर तिने यशवंत महाविद्यालयातून एलएलबीचे शिक्षण पूर्ण केलं केले.
ती देशात तिसरी, राज्यात दुसरी तर विदर्भात पहिली तृतीयपंथी वकील होण्याचा मान तिने मिळवला आहे. तीन ते चार पदव्या असलेली तृतीय पंथातील आपण पहिलेच असल्याचा दावाही शिवानीने बोलतांना केला. तिने महिंद्रा आणि श्रीराम फायनान्स या कंपन्यांमध्ये काही दिवस नोकरी केली. परंतु एका मुलाच्या वेशात जाणे पसंद न पडल्याने आणि तिला काही अपमानजनक गोष्टीचा सामना करावा लागल्याने तिने नोकरी सोडली आणि थेट मुंबई गाठली. काही दिवस मुंबई राहिल्या नंतर पुन्हा ती वर्ध्यात परत आली.
हेही वाचा - कॉल सेंटरमध्ये काम करणारा मुलगा ते IPS अधिकारी, संघर्षाला नशिबानेही दिली साथ
कोरोना काळात शिवानी वर्धेला आली. त्यानंतर मात्र आता वर्धेतच आमच्या तृतीयपंथीमध्ये जनजागृती करून त्यांना सन्मानाने जगण्यासाठी सामाजिक संघटनेच्या माध्यमातून काम करण्याचा निर्णय घेतला. आमच्याकडे काही लोक भीक म्हणून बघतात. आम्ही मात्र त्याला शगुन समजतो. आमच्यातील लोकांनाही स्वाभिमानाने जगता यावे, यासाठी आपल्याला तृतीयपंथांचा नेता व्हायचे आहे. त्यासाठी आपण राजकारणातही प्रवेश केला आहे. आपण आपल्या शिक्षणाचा वकिलीचा उपयोग करून तृतीय पंथी समाजाला शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न करू तसेच सामाजिक कार्यासाठी काम करणार असल्याचे शिवानी सुरकार हिने सांगितले.
तृतीयपंथी समुदायातील लोकांना अनेकवेळा अडचणींचा, अपमानाचा सामना करावा लागतो. चांगली नोकरी न मिळणे, घर भाड्याने किंवा विकत न घेता येणे, समाजामध्ये आदरपूर्वक वागणूक न मिळणे, अर्थातच सर्वांप्रमाणे या समुदायातील व्यक्तींना देखील सन्मानाने जगण्याचा हक्क आहे. त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणणे, त्यांच्यातील गुणांना वाव देणे, त्यांना प्रोत्साहन देणे ही काळाची गरज आहे. बदललेल्या काळानुसार अनेक तृतीयपंथी यशस्वी होत जगापुढे एक आदर्श उभा करत आहेत. तसेच तृतीयपंथी समुदायातील इतरांनी देखील शिवानी सुरकार या उच्च शिक्षित तृतीयपंथीचा आदर्श डोळ्यासमोर ठेऊन शिक्षण शिकावे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Career, Inspiring story, Success story, Wardha, Wardha news