नवी दिल्ली, 25 जानेवारी : जर तुम्ही एखादी गोष्ट करण्याचा संकल्प केलात, तर तो नक्की पूर्ण होतो. फक्त त्यासाठी गरज असते ती मेहनतीची. आज आपण अशाच एका ध्येयवेड्या तरुणाचा यशस्वी आणि संघर्षमय प्रवास जाणून घेणार आहोत. ज्याने कॉल सेंटरच्या नोकरी पासून ते आयपीएस पदापर्यंतचा यशस्वी प्रवास पूर्ण केला आहे. सूरजसिंग परिहार उत्तर प्रदेशातील जौनपूर येथील एका छोट्याशा गावातील शाळेत शिकले. ते पाचव्या इयत्तेपर्यंत त्यांच्या आजोबांसोबत राहत होते. आजोबांकडून देशाची आणि लोकांची सेवा करणाऱ्या माणसांच्या कथा ऐकत ते मोठे झाले. पाचवीनंतर, ते आपल्या पालकांसह कानपूरमधील जाजमाऊ या उपनगरात गेले आणि एका हिंदी माध्यमाच्या शाळेत दाखल झाले. मोठे झाल्यावर ते केवळ अभ्यासातच नाही तर खेळ आणि सर्जनशील लेखनातही चांगले होते. सन 2000 मध्ये, तत्कालीन राष्ट्रपती के.आर. नारायणन यांच्याकडून सर्जनशील लेखन आणि कवितेसाठी त्यांना राष्ट्रीय बालश्री पुरस्कार मिळाला. 2001 मध्ये, सर्व पाच विषयांमध्ये 81 टक्के गुण प्राप्त केल्यानंतर, त्यांनी यूपी बोर्डातून 12 व्या वर्गात आपल्या महाविद्यालयात अव्वल स्थान मिळविले. यातून उत्तम संस्थांमध्ये शिक्षण घेण्याचा मार्ग खुला व्हायला हवा होता, पण परिहारचे नियोजन वेगळे होते. त्यांचे संयुक्त कुटुंब होते आणि त्यांचे वडील एकमेव कमावते होते. परिहार यांना घरच्या उत्पन्नात हातभार लावायचा होता. त्यामुळे त्यांनी कॉलेजमधून पदवी घेतली आणि त्यांची मैत्रिण अश्विनीसोबत भाड्याच्या खोलीत इंग्रजी बोलण्यासाठी कोचिंग सेंटर सुरू केले. इंग्रजीवर केली अशी मात - विभागीय आणि राष्ट्रीय स्तरावरील निवड फेऱ्यांदरम्यान, त्यांना अनेकदा इंग्रजी अस्खलितपणे बोलू शकणार्या मुलांपेक्षा कमीपणाचे वाटले. त्यांना इंग्रजी चांगले वाचता, लिहिता आणि समजू शकत होते, परंतु संवाद ही एक मोठी समस्या होती कारण घरी किंवा शाळेत कधीही भाषा बोलली नाही. यानंतर त्यांनी वर्तमानपत्रे वाचायला सुरुवात केली, इंग्रजी चॅनेल्स पहायला आणि अनेकदा आरशात स्वतःशीच बोलायला सुरुवात केली, ते स्वतःच आपल्या बळावर इंग्रजी भाषा शिकले. घरी पाठवण्यासाठी पैसे कमवायचे होते, परंतु मोठे लक्ष्य हे पदवी स्तरावरील अभ्यास पूर्ण करणे आणि UPSC ची चांगली तयारी करण्यासाठी संसाधने वाढवणे हे होते. कॉल सेंटरमध्ये आवाज आणि उच्चारणाचे प्रशिक्षण घेतल्यानंतर परिहार परीक्षेत नापास झाला. जेव्हा त्यांना सामान बांधून निघून जाण्यास सांगण्यात आले तेव्हा त्यांनी आपले तत्कालीन व्यवस्थापक कनिष्क यांना शेवटची संधी देण्याची विनंती केली. यानंतर त्यांना एक महिन्याचा अल्टिमेटम देण्यात आला होता. त्या एका महिन्यात, सूरज परिहार यांनी इतकी कठोर परिश्रम केली की त्यांनी केवळ परीक्षा पुन्हा उत्तीर्ण केली नाही, तर अनेक वेळा कंपनीच्या उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्यांसाठी राखीव असलेल्या ‘द वॉल ऑफ फेम’मध्ये प्रवेश केला. पण त्यांचे लक्ष्य हे नाही, असे त्यांना आतून जाणवत होते. त्यामुळे त्यांनी नोकरी सोडण्याचा निर्णय घेतला. EXL च्या उपाध्यक्षांनी आपला पगार दुप्पट करण्याची ऑफर देखील दिली, परंतु परिहार आपल्या निर्णयावर ठाम राहिले. आपल्या बचतीतून, ते 2007-08 मध्ये हिंदी साहित्याचे (UPSC) प्रशिक्षण घेण्यासाठी दिल्लीला गेले, परंतु सुमारे सहा महिन्यांत पैसे संपले. यानंतर सूरज यांनी आठ बँकांसाठी पीओ परीक्षा दिली आणि त्या सर्व परीक्षांमध्ये ते उत्तीर्ण झाल्या. त्यांनी बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये 4 महिने काम केले आणि त्यानंतर ते SBI मध्ये गेले. त्यांनी या बँकेच्या आग्रा, रुरकी आणि दिल्ली शाखेत एक वर्ष काम केले आणि त्यानंतर त्यांना चमोली येथील बँक व्यवस्थापक पद देण्यात आले. ही प्रगती त्यांच्यासाठी चिंतेचा विषय ठरली होती. कारण चमोलीत बँक व्यवस्थापक पदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर ते आपल्या लक्ष्यापासून दूर जाणार, हे त्यांना माहीत होते. त्यामुळे त्यांनी बँकेची नोकरी सोडली. यानंतर सूरज यांची एसएससी परीक्षेत अखिल भारतीय 23 व्या क्रमांकासह कस्टम आणि अबकारी विभागात निरीक्षक म्हणून निवड झाली. पण त्यांचे लक्ष्य अजूनही दूर होते. हेही वाचा - मित्रांनीही विश्वास ठेवला नाही, पण अडचणींचा सामना करुन गड्यानं मैदान मारलंच, झाला IAS नशिबानेही दिली साथ - यानंतर 2011 मध्ये ते UPSC च्या पहिल्याच प्रयत्नात मुलाखती पर्यंत पोहोचले. पण त्यांची निवड होऊ शकली नाही. 2012 मध्ये परीक्षेच्या नियमांमध्ये बदल झाल्यामुळे ते मुख्य परीक्षा पास करू शकले नाही. यानंतर सूरज यांनी तिसर्या आणि शेवटच्या प्रयत्नात यूपीएससी परीक्षा पास केली आणि त्याची आयआरएससाठी निवड झाली. ही त्याची शेवटची संधी होती ज्यात आयपीएस होण्याचे स्वप्न पूर्ण होऊ शकले नाही. पण नशीब अजूनही त्यांच्यासोबत होते आणि त्यांचे ध्येय त्यांच्याकडे वाटचाल करत होते. याचवेळी, यूपीएससीमध्ये दोन प्रयत्न वाढवण्याबरोबरच, वयोमर्यादा देखील सरकारकडून दोन वर्षांनी वाढविण्यात आली. पण त्यांना दोन प्रयत्नांची गरज नव्हती, पुढच्याच प्रयत्नात सूरज यांनी ऑल इंडिया रँक 189 मिळवली आणि आयपीएस सेवेला गवसणी झाली. सूरज सिंग परिहार आता आयपीएस सूरज सिंग परिहार झाले. वयाच्या 30 व्या वर्षी त्यांनी हा करिष्मा केला. त्यांचा हा संघर्षमय प्रवास आजच्या तरुणाईला नक्कीच प्रेरणादायी आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.