नागपूर, 14 ऑक्टोबर : राज्यात लाखो विद्यार्थी दरवर्षी एमपीएससी म्हणजे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परिक्षा देत असतात. मात्र, फार मोजकेच विद्यार्थी या कठिण परिक्षेतून पास होतात. दरम्यान, नुकताच राज्य लोकसेवा आयोगातर्फे (एमपीएससी) घेण्यात आलेल्या राज्यसेवा परीक्षेचा निकाल जाहीर झाला. यात एका सलून चालकाच्या मुलीने गगनभरारी घेत एमपीएससीची परिक्षा सर केली आहे आणि आरटीओ इन्स्पेक्टर या पदाला गवसणी घातली आहे. परिस्थिती बेताची - सृष्टी दिवाकर नागपुरे, असे या यशस्वी कन्येचे नाव आहे. ती काटोल येथील रहिवासी आहे. तिच्या वडिलांचा सलूनचा व्यवसाय आहे. तसेच घरची परिस्थिती बेताची आहे. या परिस्थितीतून हार न मानता सृष्टी दिवाकर नागपूरे या तरुणीने राज्य लोकसेवा आयोगाच्या परिक्षेत बाजी मारली आहे. तिची आरटीओ इन्स्पेक्टरपदी निवड झाली आहे. अभियांत्रिकेचे शिक्षण घेतले - सृष्टी हिच्या वडिलांचे छोटेसे सलून आहे. त्यात कुटुंबाचा उदरनिर्वाह करताना मुलींना शिकवायचे आणि मोठे अधिकारी बनवविण्याचे स्वप्न आई- वडिलांनी पाहिले होते. त्यात त्यांच्या पहिल्या मुलीची मागच्या वर्षी पशुधन अधिकारी म्हणून निवड झाली. यानंतर धाकटीनेही अधिकारी होण्याचे स्वप्न उराशी बाळगले आणि तिने यात स्वत:ला सिद्ध करुन दाखवले. हेही वाचा - कोल्हापूर : ग्रामीण भागातील पोरीची गगनभरारी, वर्षाला तब्बल 60 लाखांचं पॅकेज मिळालं सृष्टीने वायसीसी कॉलेजमधून अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण केले आहे. तसेच खासगी कंपनीत नोकरी करताना जिद्दीने वेळात वेळ काढून अभ्यास करायचा आणि अधिकारी व्हायचे हे एकच ध्येय तिने ठरवले होते आणि ते तिने पूर्ण करुन दाखवले. यासाठी तिला मोठ्या बहिणीची प्रेरणा आणि आई-वडिलांचे पाठबळ मिळाले, असे आरटीओ इन्स्पेक्टरपदी निवड झालेली सृष्टी नागपुरे म्हणाली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.