नागपूर, 10 जानेवारी : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून महाविकास आघाडीतील आमदार भाजप आणि शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरू आहे. तसा दावाही नेत्यांकडून करण्यात येत आहे. आता पुन्हा एकदा असाच दावा चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे. 14 तारखेला मोठा पक्षप्रवेश होणार आहे. पक्षप्रवेशाचा मोठा भूकंप राज्याला बसणार आहे. आम्ही बोलाची कढी करत नाही असं बावनकुळे यांनी म्हटलं आहे.
नेमकं काय म्हटलं बावनकुळे यांनी?
14 तारखेला राज्यात मोठा भूकंप होणार असल्याचं बावनकुळे यांनी म्हटलं आहे. मोठा पक्षप्रवेश होणार असल्याचा दावा त्यांनी केला आहे. मात्र त्यांनी हा दावा करताना कोणत्याही पक्षाचं नाव घेतलेलं नाही. त्यामुळे बावनकुळे यांचा रोख नेमका कोणत्या पक्षाकडे आहे असा सवाल आता उपस्थित होत आहे. यापूर्वी देखील भाजप नेत्यांकडून अशाप्रकारचे दावे करण्यात आले आहेत.
जुनी पेन्शन योजना का नको? फडणवीसांनी स्पष्टचं सांगितलं, विरोधकांनाही सुनावलं
मनसे युतीवर प्रतिक्रिया
राज्यात पुढील काही दिवसांमध्ये महापालिका निवडणुकीचा कार्यक्रम लागू शकतो. या निवडणुकांमध्ये मनसे भाजप आणि शिंदे गटासोबत युती करणार असल्याची चर्चा आहे. यावर देखील बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. राज ठाकरेंनी काय निर्णय घ्यायचा तो त्यांचा अधिकार आहे. पण त्यांच्यासोबत युतीचा कुठलाही प्रस्ताव आमच्याकडे नसल्याचं बावनकुळे यांनी म्हटलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: BJP