उदय तिमांडे, प्रतिनिधी नागपूर, 4 मे : “त्या काळात शिवसेना सोडणं सोपं नव्हतं. कारण तिथे आत जाण्याचा दरवाजा होता, बाहेर येण्याचा नाही. पण मी याच नागपुरातून शिवसेना सोडली, असं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री छगन भुजबळ यांनी नागपुरात केलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या ओबीसी सेलचे दोन दिवसीय शिबीर नागपुरात होत आहे. या कार्यक्रमात भुजबळ बोलत होते. यावेळी त्यांनी शिवसेना सोडण्याचं कारणही सांगितले. काय म्हणाले छगन भुजबळ? मी शिवसेना सोडून आलो ते ओबीसीसाठी. पवार साहेब ओबीसींचा विचार करत होते म्हणून मी त्यांच्यासीबत आलो. ओबीसीचा अभ्यास करण्यासाठी सुमित्रा महाजन यांच्या अध्यक्षते खाली समिती निर्माण झाली होती. त्यांनी डेटा तयार करावा लागेल, असं सांगितलं. पण झालं नाही. दुसरी कमिटी मनमोहन सिंग यांच्या अध्यक्षतेखाली झाली. मात्र, तेव्हाही काम झालं नाही. समीर भुजबळ यांनी संसदेत मुद्दा मांडला. अनेकांनी पाठिंबा दिला, पवार साहेबांनी पाठिंबा दिल. 2016 मध्ये जो डेटा आला तो मोदी साहेबांकडे गेला. मात्र, त्यांनी आकडा जाहीर केला नाही. फडणवीस यांनी एक ताबडतोड कायदा बनविला तो टिकला नाही. मी आधीच सांगितलं होतं टिकणार नाही. इंपेरिकल डेटा त्यांच्या लोकांनी एअर कंडिशनमध्ये बसून केला. ते म्हणाले मुंबईमध्ये ओबीसी नाही. घाईघाईने एक अहवाल तयार केला. मात्र, तो अहवाल आम्हाला मान्य नाही. भाजपने मध्य प्रदेशमध्ये केलं. मात्र, ते सुद्धा अपूर्ण आहे. म्हणून जनगणना झाली पाहिजे. ज्या प्रमाणे एसी, एसटीला निधी मिळतो. त्याप्रमाणे ओबीसीला मिळाला पाहिजे. ओबीसी जनगणना झाली पाहिजे ही मागणी अनेक राज्यात झाली. तीच मागणी आमची पण आहे, ती पूर्ण झालीच पाहिजे, अशी मागणी भुजबळ यांनी केली. महाज्योतीला फक्त 50 कोटी दिले इतरांना 300 कोटीच्या वर. त्यांना द्या मात्र आम्हाला पण द्या. कंत्राटी पद आता भरली जात आहे, एकतर कंत्राटी पद भरू नये. भरली तर त्यात सुद्धा आम्हाला आरक्षण ध्या. ओबीसीसाठी वसतिगृह तयार करा ते खाजगी तत्वावरची नसावी. मराठा आणि दलित समाजातील मुलांना वसतिगृह नसेल तर त्यांना 7000 वर्षाला दिले जातात. त्याप्रमाणे आम्हाला पण द्या, अशी मागणी भुजबळ यांनी जाहीर कार्यक्रमातून केली आहे. वाचा - …तर वज्रमूठीवर लोकांचा विश्वास राहणार नाही, भुजबळांकडून राऊतांना सबुरीचा सल्ला काल रेल्वेचा एवढा मोठा अपघात झाला. कोणी राजीनामा दिला नाही, या आधी जेव्हा रेल्वे अपघात झाले त्यावेळी रेल्वे मंत्र्यांनी राजीनामे दिले. सावित्री बाई फुले यांचा महाराष्ट्र सदन मधील पुतळा हटवला. त्याचा विरोध किती लोकांनी केला. संपूर्ण इतिहास बदलला जात आहे. शिवाजी महाराज यांना पुस्तकात अर्ध पान राहणार आहे तर फुले आंबेडकर यांना किती जागा मिळणार? नुसती भाषण करून ओबीसी सेलचे आणि राष्ट्रवादीचे काम होणार नाही. तुम्हाला काम करावं लागणार आहे, रस्त्यावर उतरावं लागणार असल्याचं आवाहन भुजबळ यांनी कार्यकर्त्यांना केलं आहे. ओबीसी सेलमध्ये ईश्वर बालबुद्धे यांनी चांगलं काम केलं. मात्र, भाकरी फिरवण्यासाठी त्यांनी अध्यक्ष पदावर दुसऱ्याला नेमले. मात्र, भाकरी पालटत असताना ती कच्ची राहू नये हे बघितलं पाहिजे. नाहीतर ती खाता येत नाही. पवार साहेबांनी ओबीसी समाजासाठी मोठं काम केलं. शाहू, फुले, आंबेडकर यांचा वारसा घेतला हे इतर पक्षात नाही. बाकी पक्षात फक्त नावाला ओबीसी सांगतात. मात्र, करणी वेगळी असते, अशी टीकाही भुजबळ यांनी केली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.