नागपूर, 4 मे : ‘लोक माझा सांगाती’ या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात मंगळवारी (2 मे) राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी अध्यक्षपदावरून पायउतार होण्याची घोषणा केली. यानंतर पक्षातील नेत्यांसह कार्यकर्त्यांना मोठा धक्का बसला आहे. अनेक नेते आणि कार्यकर्त्यांना तर सभागृहातच अश्रू अनावर झाले. पवार यांनी आपला निर्णय मागे घ्यावा अशी मागणी सर्वजण करत आहे. यावर आता राष्ट्रवादीचे नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी प्रतिक्रिया दिली आहे. काय म्हणाले अनिल देशमुख? राष्ट्रवादी काँग्रेसच्या उद्या (शनिवार) होणाऱ्या बैठकीमध्ये शरद पवार यांची मनधरणी करणार असून त्यांनी अध्यक्षपदी कायम राहावं हीच सर्व कार्यकर्त्यांची मागणी आहे. शरद पवारांव्यतिरिक्त इतर कोणाचेही नाव अध्यक्ष पदाकरता चर्चेत नसून शरद पवार अध्यक्ष राहिल्यास पक्षाला त्याचा फायदा होईल. विरोधी पक्षाची एक मूठ करण्यात देखील शरद पवार यांचा महत्त्वाचा वाटा राहील. त्यामुळे शरद पवार हेच अध्यक्षपदी कायम राहावी, अशी मागणी उद्याच्या बैठकीत करणार असल्याचं कमिटीचे सदस्य आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी स्पष्ट केलं. वाचा - मोठी राजकीय घडामोड, मुख्यमंत्री शिंदे राज्यपालांच्या भेटीला, हे कारण आलं समोर पवारांचा कार्यकर्त्यांना संकेत शरद पवार यांनी आज यशवंतराव चव्हाण सेंटर बाहेर आंदोलन करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची भेट घेतली. यावेळी कार्यकर्त्यांनी तुम्हीच अध्यक्षपदी राहावे, बाकी तुमचे सर्व निर्णय मान्य असल्याची भूमिका मांडली. यावर पवारांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली. मी घेतलेला निर्णय पक्षाच्या भवितव्यासाठी घेतला आहे. उद्या पक्षाचे काम कसे चालणार, यासाठी निर्णय घेतला आहे. पण ही गोष्ट खरी आहे, असा निर्णय घेत असताना आधी सहकाऱ्यांची चर्चा करावी लागते. पण मला खात्री होती, मी तुम्हा लोकांशी चर्चा केली असती तर तुम्ही मला कधीच ‘हो’ म्हटलं नसतं. मी तुम्हाला विश्वासात घेवून निर्णय घेतला पाहिजे होते ते मी केले नाही ही माझी चूक होती, अशी कबुली पवारांनी यावेळी कार्यकर्त्यांसमोर दिली. सर्वांशी चर्चा करून एक ते दोन दिवसांमध्ये निर्णय घेऊ. कार्यकर्त्यांची जी भावना आहे, ती दुर्लक्षित केली जाणार नाही. एवढंच मी तुम्हाला सांगतो, दोन दिवसानंतर तुम्हाला असं बसावं लागणार नाही, असं सांगत शरद पवारांनी संकेत दिले आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

)







