नागपूर, 2 ऑक्टोंबर : यंदा अश्विन शारदीय नवरात्र उत्सव सर्वत्र मोठ्या हर्ष उल्हासाने आणि जल्लोषात साजरा होत आहे. वेगवेगळ्या रूपात दर्शन देणाऱ्या दुर्गादेवी या उत्सवातील खास आकर्षण असतात. त्याचबरोबर विविध मंडळांनी केलेल्या आकर्षक देखाव्यांची आरास हा देखील मोठा कुतूहलाचा विषय असतो. अशाच अप्रतिम देखाव्यांसाठी प्रसिद्ध असलेल्या नागपुरातील राणी लक्ष्मीबाई दुर्गा उत्सव मंडळाने शरद ऋतूच्या संकल्पनेवर भव्य असा 'स्वप्नलोक' देखावा साकारला आहे.
प्रदूषणरुपी महिषासुराचे मर्दन
मागील सोळा वर्षांपासून सातत्याने नावीन्यपूर्ण देखाव्यासाठी लक्ष्मी नगर, आठ रस्ता चौक येथील राणी लक्ष्मीबाई दुर्गा उत्सव मंडळ प्रख्यात आहे. यंदा 3 महिन्याच्या अवधीत अनेक कलाकारांच्या साह्याने विलोभनीय 'स्वप्नलोक' साकार करण्यात आले आहे. पश्चिम बंगाल येथील कालिगंज, मालदा येथील रहिवासी असलेल्या निहार देबनाथ यांच्या संकल्पनेतून ही कलाकृती साकारण्यात आली आहे. प्रदूषणरूपी महिषासुराचे मर्दन करणारी महिषासुरमर्दिनी अशी देखाव्या मागील संकल्पना आहे. हा देखावा नागपूरकरांसाठी आकर्षणाचा केंद्र ठरत आहे.
स्वर्गलोकात प्रवेश केल्याचा भास
दरवर्षी साकारण्यात येणाऱ्या आपल्या नवीन संकल्पनेमुळे राणी लक्ष्मीबाई दुर्गा उत्सव मंडळ शहरात प्रसिद्ध आहे. दररोज मोठ्या संख्येने नागपूरकरसह प्रमुख मान्यवरांचे देखील आगमन हा देखावा पाहण्यासाठी होत आहे. देवीच्या दर्शनास मंडपात शिरताच भाविकांना स्वर्गलोकात प्रवेश केल्याचा भास होतो, अशी माहिती मंडळाचे अध्यक्ष प्रसन्न मोहिले यांनी दिली.
Video: सर्व मनोकामना पूर्ण करणारी अग्याराम देवी, 2706 अखंड ज्योतींनी उजळले मंदिर
कालियागंज येथेच तयार केला देखाव्याचा ढाचा
अडीच महिने कालियागंज येथेच या देखाव्याचा संपूर्ण पायाभूत ढाचा तयार करण्यात आला. त्यानंतर हा ढाचा ट्रान्सपोर्टद्वारे नागपुरात आणण्यात आला. मंडळाच्या वतीने यापूर्वी चंद्रयान, सबमरीन, नागपूर मेट्रो, विवेकानंद मेमोरियल आदी सुंदर देखावे नागपुरकरांसाठी आयोजित करण्यात आले होते.
Video : कोल्हापूरच्या अंबाबाईचे घ्या नागपुरात दर्शन, घरातच साकारला नयनरम्य देखावा
मंडळ सामाजिक कार्यातही अग्रेसर
मंडळाच्या वतीने सामाजिक बांधिलकी जपत वर्षभर अनेक सामाजिक कार्य देखील केले जातात. वृक्षारोपण, मातोश्री वृद्धाश्रम येथे गरजू साहित्य वाटप, शालेय साहित्य वाटप, डिजिटल शाळा असे अनेक उपक्रम मंडळाद्वारे राबविण्यात येत असतात. देवीच्या रूपात स्त्रियांप्रमाणे किन्नर किंवा तृतीयपंथीयांनाही महत्त्वाचे स्थान आहे. हे महत्त्व लक्षात घेत मंडळाने विशेष पाऊल टाकत तृतीयपंथीयांना आरतीचा मान देऊन त्यांचा सत्कार केला असल्याची माहिती मंडळाचे उपाध्यक्ष वैभव गांजापुरे यांनी दिली.
चित्र प्रदर्शनाचे आयोजन
मंडळाच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही वैशिष्ट्यपूर्ण चित्र प्रदर्शन भरविण्यात आले आहे. यंदा लडाख ते कन्याकुमारी असा संपूर्ण भारत आपल्या सेवा कार्याने व्यापणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सेवाकार्याची गाथा सचित्र दर्शनाद्वारे मांडण्यात आली आहे. तसेच यंदा निमंत्रण असलेल्या पास धारकांसाठी मुंबई येथील लाईव बॅन्डचीही व्यवस्था आहे. फक्त निमंत्रितांसाठी गरबा खेळण्याची सोयही करण्यात आली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Nagpur, Nagpur News, Navratri, नागपूर, मंदिर