उदय तिमांडे, प्रतिनिधी नागपूर, 28 जुलै : नागपूर शहरात दिवसेंदिवस गुन्हेगारी वाढत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. पुन्हा एकदा नागपूर शहर दुहेरी हत्याकांडाने हादरलं आहे. पैसे दुप्पट करण्याचे आमिष दाखवून दोन व्यावसायिकांकडून दीड कोटी रुपये घेतले, त्यानंतर दोघांनाही संपविण्यात आल्याची घटना नागपूरात घडली आहे. या घटनेनंतर परिसरात भितीचे वातावरण निर्माण झालं आहे. नागपुरात दुहेरी हत्याकांड निराला कुमार सिंग (वय 43 वर्षे) आणि अंबरीश देवदत्त गोले (वय 40 वर्षे दोघे रा. एचबी टाऊन नागपूर) अशी मृतांची नावे आहे. आरोपींकडून हिस्लॉप कॉलेजजवळ असलेल्या चिटणवीस सेंटरमधून या दोन्ही व्यावसायिकांचे अपहरण करण्यात आले होते. त्यानंतर दोघांना गोळ्या झाडून संपविण्यात आले. तळेगाव पोलिसांना एका व्यावसायिकाचा मृतदेह मिळाला आहे. खडका गावाजवळ वर्धा नदीच्या काठावर मृतदेह आढळून आला. नागपुरातील सोनेगाव आणि बर्डी पोलीस ठाण्यात व्यापारी बेपत्ता झाल्याचे दोन वेगवेगळ्या तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत. तपास सुरू असतानाच पोलिसांनी काही तासातच या प्रकरणातील पाच आरोपींना अटक केली आहे. ओंकार महेंद्र तलमले, हर्ष आनंदीलाल वर्मा, दानेश दुर्गाप्रसाद शिवपेठ, लकी संजय तुरकेल आणि हर्ष सौदागर बागडे अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. सध्या एकाचा मृतदेह सापडला असून दुसऱ्याचा शोध सुरू आहे. वाचा - शेतीच्या वादातून तुफान राडा; तलवारी, गावठी पिस्तुलाचा वापर, घडल भयानक काय आहे प्रकरण? याबाबत मिळालेली माहिती अशी की, नागपूरमधील दोन तरुण व्यापाऱ्यांचे अपहरण करण्यात आले होते. यानंतर दोन्ही व्यापारी बेपत्ता असल्याची तक्रार बर्डी आणि सोनेगाव पोलीसात देण्यात आली होती. यानंतर दोन्ही व्यापाऱ्यांची हत्या करण्यात आली आणि त्यांचे मृतदेह नदीत फेकून देण्यात आले. दोघांचाही गोळी झाडून हत्या केल्याचं सांगण्यात येत आहे. नागपूर जिल्ह्यातील तळेगाव इथं नदी पात्रातून त्यांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.