विशाल देवकर, प्रतिनिधी नागपूर, 25 मे: दिवसागणिक वाढते शहरीकरण, औद्योगीकरण आणि त्यातून होणारा निसर्गाचा ऱ्हास या सर्व गोष्टींचा फटका वन्य प्राण्यांना देखील मोठ्या प्रमाणावर बसतो आहे. टायगर कॅपिटल ऑफ इंडिया अशी ओळख असलेल्या नागपूर शहराच्या परिघात मोठ्या प्रमाणात वन संपदा आहे. तसेच शहारांतर्गत देखील विपुल प्रमाणात जैवविविधता आहे. वन्य जीवांच्या अपघातात त्वरित उपचार, बचाव आणि संगोपनाची गरज असते. हेच कार्य करणाऱ्या मध्य भारतातील एकमेव असलेले नागपुरातील ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटर करत असून ते वन्य प्राण्यांसाठी वरदान ठरत आहे. भारतातील पहिलाच प्रयोग ट्रांझिट ट्रिटमेंट सेंटर ही सकल्पना भारतात पहिल्यांदा नागपुरात अस्तित्वात आली. 2015 साली या संकल्पनेला मूर्त रूप सेमिनरी हिल्स येथे प्राप्त झाले. या सेंटर मागील मूळ संकल्पना अपघात किंवा अन्य कारणांनी जखमी झालेल्या वन्य प्राण्यांचा बचाव करणे, उपचार करणे आणि त्यांना त्यांच्या नैसर्गिक अधिवासात सुखरूप सोडणे अशी आहे.
दवाखान्याप्रमाणे चालते कार्य डॉक्टरांच्या उपचारानंतर वन्य जीव बरा झाल्यासच त्याला निसर्ग अधिवासात मुक्त संचार करण्यास ट्रान्झिट ट्रिटमेंट सेंटरच्या वतीने सोडण्यात येते. विशेष म्हणजे यामध्ये कुणाचीही पूर्व परवानगी घेण्याची गरज भासत नाही. एकप्रकारे पशु रुग्णालया प्रमाणे येथे कार्य चालते. आता पर्यंत या ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटर मधून साडे पाच हजारहून अधिक वन्य प्राण्यांना वाचवण्यात यश आले आहे. इतर राज्यात देखील कार्यरत होणार सेंटर महाराष्ट्रासह देशात नागपूर शहरात असे एकमेव सेंटर आहे. आगामी काळात महाराष्ट्रात 11 जिल्ह्यात असे सेंटर उभारण्यात येणार आहे. यासह बाहेर राज्यात कर्नाटक, पंजाब, राजस्थान या राज्यात देखील ट्रान्झिट ट्रिटमेंट सेंटर उभारण्याची प्रक्रिया सुरू आहे, अशी माहिती ही संकल्पना ज्यांना सुचली ते कुंदन हाते यांनी दिली. 3 वेळा मृत्यू हरवलं, आता आयुष्याची कमाई दिली कॅन्सर रुग्णालयाला दान! Video कसे आहे ट्रान्झिट ट्रिटमेंट सेंटर? नागपुरातील ट्रान्झिट ट्रिटमेंट सेंटरमध्ये आज घडीला 3 विभाग आहेत. त्यात रेस्कू सेंटर, डॉग स्कॉट आणि ट्रान्झिट ट्रिटमेंट सेंटर असे आहेत. वन्यप्राण्यांच्या बचावासाठी आमचा स्टाफ 24 x 7 उपलब्ध असतो. रेस्कू करून आणलेल्या प्राण्यांना त्वरित डॉक्टर कडून उपचार केले जातात आणि त्यांची योग्य ती काळजी घेतल्या नंतर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांना निसर्ग अधिवासात मुक्त करण्यात येते. मात्र शेडुल 1 मधील जर प्राणी असतील तर वरिष्ठांच्या परवानगीने पुढील प्रक्रिया केली जाते, असे वनपरीक्षेत्र अधिकारी प्रतिभा रामटेके यांनी सांगितले. लोकांचे सहकार्य गरजेचे या कार्यात लोकांचे सहकार्य असणे फार महत्त्वाचे आहे. नागपूर शहर व परिसरात हे एकमेव सेंटर असल्याने लोकांचे सहकार्य लाभले तर अधिका अधिक प्राण्यांचे प्राण वाचण्यात यश येईल. नागपुरातील ट्रान्झिट ट्रिटमेंट सेंटर मधून आजतागायत 5 हजारांहून अधिक वन्य जीवांना जीवन दान देण्यात यश आले आहे. मुक्या प्राण्यांना जीवदान देण्यासाठी हे सेंटर वरदान ठरत आहे, अशी माहिती रामटेके यांनी दिली.