विशाल देवकर, प्रतिनिधी नागपूर, 31 मे: आयुष्याच्या प्रवासात माणूस हा शेवटच्या क्षणापर्यंत विद्यार्थीच असतो. मात्र घरची परिस्थिती आणि व्यक्तिगत जीवनातील संघर्षामुळं शिक्षण अर्ध्यावर सोडून द्यावं लागलेल्यांची संख्या कमी नाही. शिक्षणात एकदा खंड पडल्यास पुन्हा जोमाने अभ्यास करणं फार थोड्या लोकांना जमतं. मात्र दुर्दम्य इच्छाशक्ती असेल तर अशक्य वाटणारी गोष्ट देखील सहज शक्य होऊ शकते. नागपुरातील शुभांगी खुबाळकर या वयाच्या 38 व्या वर्षी बारावी परीक्षा उत्तीर्ण झाल्या आहेत. विशेष म्हणजे प्रपंचाचा गाडा आणि नोकरी सांभाळत त्यांनी हे यश मिळवलंय. नववीतच सुटलं शिक्षण शुभांगी खुबाळकर यांच्या घरची परिस्थिती बेताची असल्यानं इयत्ता नववीतच शिक्षण सोडावं लागलं. त्यातनंतर लग्न झालं आणि संसारामुळं शिक्षणाचा विषयच संपला. पती बस कंडक्टर म्हणून काम करतात त्यामुळे सावनेरमधील खापा हे मूळ गाव सोडून नागपूरला स्थायिक झाले. मुली जाईबाई चौधरी ज्ञानपीठ येथे शिक्षण घेत होत्या. त्यामुळे प्राचार्य सुधाकर चौधरी यांच्याशी ओळख झाली. त्यामुळे माझ्या शैक्षणिक जीवनाला नवी दिशा मिळाली, असे शुभांगी सांगतात.
शिपाईची नोकरी करतानाच सुरू झालं शिक्षण शुभांगी पुढे सांगतात की, प्राचार्य चौधरी सरांना माझी आर्थिक अडचण सांगितली. त्यांनी मला शाळेत नोकरी व राहायला घर दिले. त्यांना असे वाटते की मी उच्चशिक्षित आहे. मात्र मी हा गैरसमज दूर केला आणि सत्यता त्यांच्यापुढे मांडली. त्या क्षणी प्राचार्य सुधाकर चौधरी सरांनी मला पुढील शिक्षण पूर्ण करण्यासाठी प्रेरणा दिली. शिक्षणाचे मूळ समजावून सांगितले. माझ्या यशात शिक्षकांचा वाटा चौधरी सरांमुळे पुन्हा शिक्षण सुरू झालं. तसेच आमच्या शाळेतील इतर शिक्षक वर्गाने मला प्रोत्साहित केलं. त्यामुळे मी मनाशी निश्चय करून माझे शिक्षण पूर्ण करत बारावीची परीक्षा उत्तीर्ण केली. या यशामध्ये माझ्या कुटुंबातील सदस्य, जाईबाई चौधरी ज्ञानपीठ या महाविद्यालयाचे सर्व गुरुजन यांचा सिंहाचा वाटा आहे, अशी माहिती शुभांगी खुबाळकर यांनी दिली. इस्त्रीवाल्याच्या मुलीनं जिद्दीनं करून दाखवलं, लेकीचं यश पाहून कुटुंबीय गहिवरले, Video मुलीनं घेतला अभ्यास सुरुवातीला मला प्रचंड मेहनत घ्यावी लागली. मला पाठांतर करण्यास अडचण येत होती. प्रसंगी माझी मोठी मुलगी प्रांजली ही माझा अभ्यास घ्यायची. शाळेतील शिक्षक वर्गांच्या मार्गदर्शनाखाली मी फावल्या वेळेत जमेल तसा अभ्यास करत होते. घर, नोकरी आणि अभ्यास कठीण वाटत होतं. पण सर्वांच्या सहकार्यामुळे आधी दहावी आणि आता बारावीची परीक्षा 50 टक्के गुण घेऊन मी उत्तीर्ण झाले, असं शुभांगी सांगतात.