नागपूर, 23 मे : सध्या देशात आयपीएलचा फिवर सुरू आहे. याचा गैरफायदा घेत अनेक ठिकाणी खेळावर सट्टा लावण्याचे प्रकार उघडकीस येत आहेत. राज्यात अनेक ठिकाणी सट्टेबाजांवर कारवाई करण्यात आली आहे. या सट्ट्याचे व्यसन एकाच्या जीवावर बेतलं आहे. क्रिकेट सट्टयात हरल्यामुळं प्रचंड आर्थिक फटका बसलेल्या नागपुरातील एका तरुणानं आत्महत्या केल्याची घटना घडली. नागपूर शहरातील छापरु नगर परिसरातील ही घटना आहे. 20 वर्षीय खितेन वाघवणी असं या तरुणाचं नाव असून मुलानं आत्महत्या केल्याचं कळताच आईनेही आत्महत्या करत आपलं जीवन संपवलं आहे. या माय लेकांवर एकाच वेळी अंत्यसंस्कार करण्यात आले. दरम्यान, या घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
काय आहे प्रकरण?
खितेन हा सरळस्वभावी आणि संस्कारी मुलगा होता. मात्र, चुकीच्या संगतीला लागून तो क्रिकेटवर सट्टा लावू लागला. गेल्या वर्षी आयपीएलमध्ये तो सट्टा हरला. याची माहिती वडिलांना मिळाल्यावर वडिलांनी त्याला पैसे दिले होते. मात्र, यावर्षी तो पुन्हा आयपीएलमध्ये सट्टा खेळला आणि हरला. सट्टेबाज त्याला पैशासाठी त्रास देत होते. त्यामुळं खितेन तणावात गेला होता. त्यातूनच त्यानं आत्महत्या केली. हे त्याच्या आईला कळल्यावर आईला प्रचंड मानसिक धक्का बसला आणि आईनेही विषारी रसायन पिऊन आत्महत्या केली.
वाचा - शाहरुखसोबतच्या चॅटवरुन सीबीआयचा गंभीर आरोप, म्हणाले 'वानखेडे हे मेसेज..'
या मायलेकांच्या आत्महत्येमुळं वडील आणि बहीण यांना मोठा मानसिक धक्का बसला आहे. परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. मात्र, ऐन 20 वर्षाच्या वयात मुलगा सट्टा लावतो याची कल्पना कुटुंबियांना नव्हती. त्यामुळं आई वडिलांनी आपल्या मुलांकडे लक्ष देण्याची गरज आहे.
नागपुरात सट्टेबाजांना अटक
आयपीएल स्पर्धेच्या सामन्यांवर सट्टा चालविणाऱ्या अड्ड्यावर धाड टाकत पोलिसांनी एका आरोपीला अटक केली. शहरातील लहान वस्त्यांमध्ये असे प्रकार सुरू असल्याचा संशय असून पोलिसांकडून येत्या दिवसांत कारवाई वाढण्याची शक्यता आहे. अजनी पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुन्हेशाखेच्या युनिट क्रमांक तीनच्या पथकाने ही कारवाई केली. त्यातच अशी घटना घडल्याने यातील भयानक वास्तव आता समोर आलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: IPL 2023, Nagpur News, Suicide